पक्ष्यांसाठी पाणवठे हवेत

गुरुवार, १२ मे २०११

  पुणे शहरात अनेक नागरिकांना ‘बर्ड फीडर’ बरण्या मोफत दिल्याची बातमी वाचनात आली. काही दिवसांनी एका मोठय़ा गाडीवर बर्ड फीडरची जाहिरात पाहिली.  जाहिरातीमध्ये जगभर या बरण्यांचे वाटप चालू असल्याचे आणि ‘चिमण्या वाचवा’ अशा अर्थाचा मजकूर छापला होता. या बरण्या फक्त चिमण्या (व इतर शहरी पक्षी) यांच्यापुरत्या मर्यादित असतील तर काही हरकत असण्याचे कारण नाही. (आपण पूर्वीपासून सडा- संमार्जन झाल्यावर पक्ष्यांना दाणा-पाणी रोज नियमितपणे ठेवत होतो. ती पद्धत फ्लॅट संस्कृतीत नष्ट झाली.)
सरसकट सर्वच पक्ष्यांना या बर्ड फीडरचा काही उपयोग नाही आणि आवश्यकता नाही. पक्ष्यांचे अन्न वेगवेगळे असते. काही पक्षी फक्त फुलांमधील मधुरस पिऊन भूक भागवत असतात. त्यांना फुलटोचे म्हणतात, झाडावरची फळे-बिया हे काही पक्ष्यांचे अन्न असते, काही पक्षी कीटक-अळय़ा खाणारे असतात, काही पक्षी फक्त मृत प्राण्यांवर ताव मारतात, काही पक्षी मासे खाणारे असतात, गरुडासारखे मोठे पक्षी जिवंत प्राणी उचलून नेतात आणि काही पक्षी धान्य-दाणे खाणारे असतात.
पक्ष्यांनी अन्न शोधणे ही त्यांची नैसर्गिक क्रिया आहे. बर्ड फीडर म्हणजे पक्ष्यांचा नैसर्गिक जीवनक्रम बदलणे-आळशी बनवणे-माणसावर अवलंबून ठेवणे असे माझे मत आहे. शहरी जीवनशैलीचा विचार केल्यास रोज आपण कित्येक टन अन्न वाया घालवतो. टाकून देतो. असे अन्न, भाजीपाला, कचऱ्यामधील कीटक, अळय़ा इ.मुळे पक्ष्यांना खाण्याची कमतरता नसावी असे वाटते. पक्ष्यांसाठी आवश्यक असलेली फळझाडे आणि घरटी करण्यासाठी योग्य अशा वृक्षांची लागवड करणे जरुरीचे आहे. परंतु सर्वसाधारणपणे पक्ष्यांना अन्नापेक्षा पाण्याची गरज जास्त आहे. पक्ष्यांना स्वच्छ पाण्यासाठी खूप शोध घ्यावा लागतो. त्याचे कारण शहरातील सर्व जलस्रोत नाहीसे झाले आहेत. विहिरी, तळी, हौद, झरे, ओढे, नद्या काहीही शिल्लक नाही. असेल तर फक्त गटाराचे पाणी.
ज्यांच्याकडे थोडीफार जागा असेल त्यांनी शोभेच्या झाडांच्या ५० कुंडय़ा ठेवण्यापेक्षा एक तरी वृक्ष लावावा आणि बागेत बर्ड्स बाथ ठेवावा. त्याची आज नितांत आवश्यकता आहे. हा बर्ड्स बाथ पसरट आणि उथळ असावा म्हणजे अगदी लहान सूर्यपक्षीसुद्धा त्यात अंघोळ करू शकतील. पक्ष्यांना सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी वर्दळीपासून दूर बर्ड्स बाथ ठेवावा. ज्यांच्याकडे जागा नाही त्यांनी आपल्या बाल्कनीत रोज एका थाळीमध्ये पाणी भरून ठेवावे. काही दिवसांनी परिसरातील पक्ष्यांना ती जागा माहितीची होईल.

(बर्डस  बाथमुळे माझ्या बागेत रोज किमान १००-१५० पक्षी येतात.)
नंदू कुलकर्णी, पुणे

2 Comments:

Ashish Sawant said...

बर्ड फीडर म्हणजे पक्ष्यांचा नैसर्गिक जीवनक्रम बदलणे-आळशी बनवणे-माणसावर अवलंबून ठेवणे असे माझे मत आहे +1

तुमच्या या विचारला पूर्ण सहमत. सुंदर माहिती.
हे बर्ड्स बाथ कसे असते ते नाही समजले.
जमल्यास पुढच्या पोस्ट मध्ये त्याचा फोटो लावावा.

pravin said...

धन्यवाद आशिष!बर्डस बाथ म्हणजे कमी खोलीचे परातीएवढे किंवा मोठे पसरट भांडे ज्यात उभे राहिल्यावर पक्ष्यांच्या गळ्यापर्यंत पाणी लागेल पण ते बुडणार नाहीत.त्यात पाणी ठेवल्यावर पक्षी त्यात अंग घुसळून आंघोळ करतात.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...