जागतिक वसुंधरा दिन विशेष :वने ‘रक्षण्या’ कारणे यत्न व्हावा

सौजन्य :  मालविका देखणे ,नागपूर ,शुक्रवार, २२ एप्रिल २०११,लोकसत्ता
malayash@rediffmail.com

वैश्विक उष्मा, प्रदूषण, अन्न समस्या, ताणतणाव, पर्यावरणाचा ऱ्हास, संसाधनांची कमतरता, जलसंकट हे प्रगत मानवाला भेडसावणारे काही गंभीर प्रश्न. यातील बहुतेक प्रश्नांचे उत्तर ‘वनांत’ आहे, असे सांगितल्यास तुम्ही हसण्यावारी न्याल. पण हे १०० टक्के खरे आहे. किंबहुना ‘मानवाचे अस्तित्वच वनांवर अवलंबून आहे’ हे विधान अजिबात धाडसाचे होणार नाही. भविष्य जोपासायचे असेल तर वने जोपासा. ‘झाडे लावा- झाडे जगवा- मानवाला जगवा’ असेच पर्यावरणप्रेमी सांगतील.
ज्यांना कोणीही वाली नाही अशा विचाराने आपण कुऱ्हाडीच्या घावाने जमीनदोस्त केलं; स्थिर व मूक असल्याने वाटेल तसे छाटून विद्रूप केलं, ओरबाडलं, त्यांच्याच हातात आपले श्वास आहेत, हे कटुसत्य मानवाच्या लक्षात आले आहे. पादपांचे पाय धरण्यावाचून पर्याय नाही ही जाणीव झाली आहे. वनरक्षण, वनसंवर्धन व वनवर्धन यांचे महत्त्व जगासमोर पुन्हा एकदा मांडण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे (युनायटेड नेशन्स) सेक्रेटरी जनरल बान की मून यांनी म्हटले, ‘‘२०११ हे साल जागतिक वनवर्ष म्हणून घोषित करून जागतिक समाजाला वनांच्या ऱ्हासामुळे होणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय मूल्यांबाबत जागृत करण्यासाठी जागतिक मंच उपलब्ध करून दिला आहे.’’ सुजाण मित्रांनो, आता गरज आहे ती या संधीचे सोने करण्याची. कारण आता वनांबाबत उदासीन राहणे आपल्या विनाशावर शिक्कामोर्तब करण्यासारखेच आहे. आंतरराष्ट्रीय वनवर्षांचे बोधचिन्ह अत्यंत समर्पक आहे. मानवी जीवनात वनांचे सर्वस्पर्शी उपयोग यात मांडले आहेत.
वनवर्षांचे बोधवाक्य आहे ‘फॉरेस्ट फॉर पीपल, अर्थात माणसांसाठी वने’. पण यातील गर्भित अर्थ हाही आहे की वने हवी असतील तर त्यांचे शाश्वत व्यवस्थापन करा (सस्टेनेबल मॅनेजमेंट, संपोषित व्यवस्थापन). घनवनांची निर्मिती पृथ्वीच्या इतिहासात बरीच उशिरा म्हणजे सुमारे २४.५ ते ९ कोटी वर्षांदरम्यान झाली असली तरी पृथ्वी मानवासाठी वस्तीयोग्य बनवली ती वनांनीच यात दुमत नाही. प्रारंभी वनांवरच पूर्णत:अवलंबून असलेल्या माणसाने वनांना पवित्र मानले. मात्र जसजसा मानव उत्क्रांतीचे टप्पे गाठू लागला, तसतसा वनांचा उपयोग तो आपल्या प्रगतीसाठी करू लागला.
शेतीसाठी जमीन, वस्तीसाठी जमीन, गुरांसाठी कुरणे या सर्वासाठी जमीन कापून- जाळूनच आली. स्लॅश अँड बर्न, झूम कल्टिव्हेशन या पद्धतीत आजही वनेच बळी पडतात. वने नष्ट करण्याची परंपरा १० ते १२ हजार वर्षे जुनी आहे आणि ही परंपरा आपण कायम ठेवली आहे. वने कापण्यासाठी नित्यनूतन कारणांची भर पडत आहे. वाढती लोकसंख्या, वाढत्या गरजा, वाढते प्रदूषण यांमुळे ही बाब अधिकच गंभीर झाली आहे.
या पाश्र्वभूमीवर वनांच्या (झाडांच्या) उपयोगांची उजळणी करणे योग्य ठरेल (वन म्हणजे नुसताच झाडांचा समूह नाही. मात्र त्यातील मुख्य कार्यक्षम घटक झाडेच असतात.). यामुळे वनांना पर्याय नाही हे पुन्हा मनावर ठसेल. मानवाला जोजवण्यापासून चिरनिद्रेनंतर त्याला विश्रांती देण्याचे कार्य वृक्षच करतात. अन्न, वस्त्र, निवारा,प्राणवायूची निर्मिती, जलनियमन, जमिनीची धूप रोखणे, औषधे हे वनांचे उपयोग सर्वाना ठाऊक आहेतच. वने लक्षावधी लोकांच्या पोटाची सोय करतात. आपले श्वास सुरू राहावेत म्हणून प्राणवायूची निर्मिती तर करतातच पण ते शुद्ध राहावेत म्हणून प्रदूषकांचे हलाहल पचवण्याचे शिवशंकरी कार्यही त्यांनी स्वत:हून पत्करले आहे. बहुतेक प्रदूषकांचे दमन वने करतात. किमानपक्षी त्यांची तीव्रता तरी कमी करतात. अब्जावधी रुपये खर्च केले तरी ही कामे आपण यंत्राद्वारे करू शकणार नाही. या सर्व उपकारांनंतरही त्यांची माफक अपेक्षा हीच असावी की मानवाने त्यांना सुखाने जगू द्यावे. पण..
अगदी परखड शब्दांत सांगायचे तर वृक्ष-वनांना मानवाचा काहीएक उपयोग नाही. नाहीतर ती माणसाच्या आगमनापूर्वी जगली- फोफावली नसती. वनांचे स्वाभाविक शत्रू म्हणजे नैसर्गिक आपत्ती, वणवे आणि रोग. आज मात्र माणूसच त्यांचा सर्वात मोठा शत्रू ठरला आहे. भयंकर पूर, वादळे यांमुळे वृक्ष उन्मळून पडतात.
वणव्यांमुळे वनांचा काही भाग नष्ट होतो. मात्र आज बऱ्याच वणव्यांची कारणे माणसाने लावलेली शेकोटी किंवा आग, फेकलेली विडी-काडी हीच असतात. प्रत्येक प्रकारच्या झाडाला वेगळा रोग होतो त्यामुळे वृक्षवैविध्य असलेल्या नैसर्गिक वनांची हानी तेवढी होत नाही. मात्र माणसाने लावलेली मोनोकल्चर वने याला बळी पडतात. थोडक्यात काय तर वनांचा सर्वात मोठा शत्रू माणूसच आहे.
मानवाच्या कोणत्याही गरजेची पूर्तता करण्यासाठी पहिला घाव पडतो तो वनांवरच. वन साफ करूनच आपण नवीन जमीन मिळवतो. मग ती जमीन शेतीसाठी असो,घरबांधणीसाठी असो, नागरी सुविधांच्या नावाखाली रस्ते, रेल्वेमार्ग, उद्योग बांधण्यासाठी असो, प्रचंड धरणे,वीजप्रकल्प, चराऊ कुरणे किंवा जनावरांसाठी खाद्यान्न लागवडीसाठी असो, पहिला घाव बसतो झाडांवरच!
अर्थात हे पूर्वापार चालत आलेले आहे आणि त्याचे परिणाम माणूस आजही भोगत आहे. प्राचीन मेसोपोटेमिया (आजचा इराक) मध्ये इ.स.पू. २७०० च्या आसपास ‘उरूक’ शहरात भरपूर बांधकाम करण्यासाठी राजा गिल्गामेराने वने समूळ नष्ट केली. कालांतराने तो भाग वाळवंटी झाला. आजही तो तसाच आहे. उर, बॅबिलोन, अथेन्स, रोम ही शहरे वसवतांनाही जबर निर्वनीकरण झाले. अथेन्स वसवण्यासाठी अमाप वृक्षतोड झाली. त्यानंतर उरलेल्या लँडस्केपचे वर्णन प्लेटोने ‘एका धष्टपुष्ट शरीराचा फक्त सापळा उरला आहे,’ असे केले आहे. लेबनॉनमधील पर्वत वृक्षकटाईने कायमचे बोडके झाले. निर्वनीकरणामुळे मिनोअन संस्कृती अखेर नष्ट झाली. माया मंडळीही याच कारणाने लयास गेली. उरुक- उर येथील वृक्षतोड इतकी भीषण होती की, उरच्या राजाने वृक्षतोडीच्या विरोधातही कायदे केले.
अर्थात हा भीषण भूतकाळ आपण विसरलो आहोत. गेल्या चाळीस वर्षांत जगातील सुमारे ५० टक्के प्राचीन प्रायमरी फॉरेस्ट्स आपण नष्ट केली आहेत. भारतात वनांची टक्केवारी केवळ ११ टक्के झाली होती. आता ती सुमारे २०.६ टक्के आहे. मात्र त्यांची गुणवत्ता प्रश्नांकित आहे. हिमाचल, गुजरात येथील ताज्या वृक्षकटाईचे आकडे सुन्न करतात. अप्रकाशित आकडय़ांबद्दल तर बोलायलाच नको. मानवनिर्मित प्रदूषणामुळे आम्लवर्षां होते. यामुळे पर्वतराजीला हानी पोचते. वृक्षांच्या विविध क्षमतांवर नकारात्मक प्रभाव पडतो. युरोपातील बरीच वने आम्लवर्षांपीडित आहेत.
प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि तिच्या गरजा (जीवनावश्यक आणि त्याहून जास्त उपभोग्यलोलूप) वनांच्या नाशाचे मूळ कारण आहे. त्यातही आपण वृक्ष समूळ नष्ट करतो. म्हणजे आपल्याच हाताने सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मारून टाकतो. आज तिजोरी भरेल, पण उद्याचे काय? वनांचे शाश्वत व्यवस्थापन व वनवर्धन हाच यावरचा उपाय आहे. मूळ मुद्दलाला धक्का न लावता व्याजात गरजा भागवायच्या आणि त्याचबरोबर मुद्दल कसे वाढेल हे पाहणे म्हणजे वनांचे शाश्वत व्यवस्थापन होय. हीच काळाची गरज आहे. शाश्वत व्यवस्थापनाचा मंत्र आपल्याला विदुरनीतीत मिळतो. ‘पुष्पं, पुष्पं विचिन्वीत, मूळच्छेदं न कारयेत।’ अर्थात फूल अन् फूल वेचा मात्र झाडाला धक्काही लावू नका, हा निसर्गरक्षणाचा प्राचीन संदेश तर आपल्याच मातीतला आहे.
गेल्या शतकात मानवाच्या राहणीमानात न भूतो न भविष्यती बदल घडून आला आहे. निसर्ग हा न संपणाऱ्या स्रोतांचा खजिना आहे. या विचाराने माणसाने त्याचा बेलगाम वापर सुरू केला. हा वापर इतका जास्त झाला की, आता हिरवी आणीबाणी घोषित करण्याची वेळ आली आहे. निसर्गाचा मुक्त वापर करत माणसाने आपले राहणीमानच बदलून टाकले आहे. भरपूर वापरा, वापरा आणि फेका संस्कृती उदयाला आली. नेटका वापर, काटकसर, पुनर्वापर हे शब्द जणू व्यवहारातून बादच झाले. पिढय़ांनी राखलं ते आपण ओरपलं! अगदी दैनंदिन उदाहरणं द्यायची तर रुमाल, टॉवेल्स जाऊन टिश्यू पेपर्स आले. एखाद्या कार्यक्रमानंतर कपबशा व ताटल्या कोण धुवेल? ही कटकट कशाला? अशा विचाराने वापरा व फेका (यूज अँड थ्रो) क्रोकरी- कटलरी वापरायला सुरुवात झाली. प्लास्टिकच्या वस्तू उदंड झाल्या.
रोजगार वाढतोय ना? मग उभारा कारखाने अशी वृत्ती झाली. जमीन हवी, मग जंगलं तोडा की! हे काय विचारणं झालं? कागद इतका स्वस्त झाला की त्याचा गैरवापरच वाढला. प्रचंड जाहिराती (आकार व आकडे दोन्हीत) ब्रोशर, पॅम्फलेट्स, होर्डिग्ज, वह्य़ा सगळ्यांची गणतीच विसरलो. आराम- सुखसोयींनाच प्राधान्य मिळाले. पेयांसाठी टिनाचे डबे, प्लॅस्टिक बाटल्या आल्या.
पुन:पुन्हा वापरायचे ग्लास कोपऱ्यात गेले. इंधनाच्या वापराला काही सीमाच राहिली नाही. घरटी ३-४ दुचाकी- त्याही स्वयंचलित आल्या. खाण्याच्या पदार्थाची प्रचंड चंगळ झाली. इंधन वापरा की! परवडतंय मग वापरा की! एका कुकरी शोमधील एक प्रकारची भरली भाजी शिजवायला तब्बल ४५ मिनिटे लागली! (तेवढय़ा वेळात तर एका कुटुंबाचे जेवण सहज शिजते!) वापरा किती वापरायचे ते! कच्चा माल वनांतून येत आहेच. नव्या खाणीतून खनिजे काढायची आहेत? मग वरची वने कापून टाका की! निसर्गाचा खजिना पूर्णपणे अवलंबून असणारी वनवासी मंडळी कंगाल झाली. त्यातील काही तस्करांच्या हातातील कठपुतळ्या बनली, काही वाममार्गाला लागली आणि बदनाम झाली. आजही या परिस्थितीच्या विरोधात आपण लढलो नाही तर वने पूर्णपणे नष्ट होतील.
परंतु, २०११ च्या आंतरराष्ट्रीय वन वर्षांत जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू झाल्याने बहुतेक राष्ट्रांनी त्याची गंभीर दखल घेऊन वनरक्षण, वनविकास, पुनर्वनीकरण व शाश्वत वनव्यवस्थापन यासंदर्भात विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू केले आहेत. वनांचे खरे रक्षक असणाऱ्या वनवासीयांच्या साहाय्याने जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, वनीकरण व पुनर्वनीकरण, सोशल फॉरेस्ट्री, अ‍ॅग्रो फॉरेस्ट्री हे नवे-जुने कार्यक्रम राबविले जात आहेत. जनजागृतीसाठी सरकारी व खासगी संस्था सरसावल्या आहेत. येणारी पिढी तरी वनांबद्दल संवेदनशील व्हावी, डोळस व्हावी म्हणून काही वर्षांपूर्वीपासून पर्यावरण हा विषय शाळेत सक्तीचा झाला आहे. शाळा पातळीवर इको क्लब्जची स्थापना झाली आहे. पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. वनांवरचा भार कमी व्हावा म्हणून पुनश्चक्रीकरणाला उत्तेजन मिळत आहे. कार्बन क्रेडिट्स, फॉरेस्ट रेस्टिटय़ूशन फंड अशा नवीन आणि भन्नाट कल्पना मूळ धरू लागल्या आहेत.
कार्बन आणि वनांचा संबंध काय, असा प्रश्न मनात येणं साहजिकच आहे. पदार्थ, इंधन, यांच्या जळण्याच्या प्रक्रियेत कार्बन ऑक्साइड तयार होतो. हा वायू ग्रीन हाऊस गॅसेसपैकी एक आहे. यामुळे वैश्विक उष्मा वढत आहे. वनस्पती अन्न तयार करताना कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेतात आणि त्याला वेगवेगळ्या रूपांत कुलूपबंद करतात. याला ‘कार्बन सिक्विस्ट्रेशन’ म्हणतात आणि वनांना ‘कार्बन सिंक.’ वनांचे हे कार्य आज फार महत्त्वाचे ठरले आहे. कार्बन क्रेडिट्स व फॉरेस्ट रेस्टिटय़ूशन फंडमध्ये नुकसानभरपाईची कल्पना आहे. आम्ही कार्बन डायऑक्साइड निर्माण करतो. पण तो शोषून घेतील इतकी वने आमच्याकडे नाहीत. ती तुमच्याकडे आहेत. तेव्हा तुम्ही वने राखा. त्याचा मोबदला म्हणून आम्ही पैसे देतो. असा काहीसा प्रकार!
फॉरेस्ट रेस्टिटय़ूशन फंड असा फंड आहे की, ज्यात वनजमिनीचा वापर इतर कामांसाठी करणारी कंपनी त्या क्षेत्रफळाच्या वनाच्या पर्यावरणीय कार्याच्या नुकसानाची भरपाई म्हणून देते. हा पैसा वनांच्या लागवडीसाठी वापरला जातो. जून २००९ मध्ये भारताचा फॉरेस्ट रेस्टिटय़ूशन फंड २.५ बिलियन डॉलर्स होता!
कार्बन क्रेडिट कल्पनेत आधी सांगितलेली देवाणघेवाणीची पद्धत आहे. तुमची वने आमचा कार्बन डाय ऑक्साइड घेतील, आम्ही वनांसाठी पैसे देऊ. तुम्ही वने  कापू नका, हे पैसे वापरून प्रगती करा. अगदी नुकतेच पूमा/फ्यूमा puma या क्रीडा साहित्य बनवणाऱ्या कंपनीने केनियातील वनांना कार्बन केडिट्स या अंतर्गत मदत केली आहे. कार्बन ऑफसेट प्रोग्राम अंतर्गत श्रीमंत राष्ट्रे वनप्रचूर गरीब राष्ट्रांना वने राखण्यासाठी पैसे देतात. बायोप्रॉस्पेक्टिंग फी- बऱ्याच कंपन्या जंगली वनस्पतींपासून नवीन औषधे शोधून काढतात व त्यात बक्कळ पैसा कमावतात. ज्या जंगलांतून या वनस्पती आणल्या त्या देशांना फीपोटी पैसे देणे म्हणजे बायोप्रॉस्पेक्टिंग फी होय. अशा प्रकारे वनरक्षणासाठी पैसा गोळा होत आहे. तो योग्य कार्यासाठी वापरला जाणे महत्त्वाचे आहे.
वनऱ्हासाच्या नष्टचक्राचा कर्ता-करविता किंवा भोक्ता यापैकी एखाद्या तरी भूमिकेत आपल्यापैकी प्रत्येकजण फिट्ट बसतो, पण भोक्ता जेव्हा वस्तूंच्या वापराचा अतिरेक करतो तेव्हा तो करविता होतो.
मोठमोठय़ा जेवणावळीत वाया गेलेले अन्न कितीतरी संसाधनांची नासधूस करते. मोठमोठय़ा जाहिरातींसाठी कागद, रंग वगैरे खर्च होतो. जाहिरातीचा आकार कमी केला तरी संदेश तोच पोहोचेल नाही का? कार्यक्रम, टय़ूशन क्लास, शाळांच्या जाहिरातींची ब्रोशर्स व पॅम्प्लेट्स नंतर इतस्तत: विखुरलेली असतात.
यासाठी किती कागद नासला जातो याला गणतीच नाही! लग्न-मुंज आणि इतर कार्यक्रमांच्या फॅन्सी पत्रिकांचे कौतुक इतरांना वाटते.
पर्यावरणप्रेमींना नाही. भरपूर पैसा बाळगणाऱ्या बहुतेक मंडळींबद्दल काय बोलावे? आम्ही असू पैसेवाले, सरकारचे लाडके, तुम्ही वित्तहीन, तुम्ही दोडके अशी त्यांची गुर्मी! या गुर्मीतूनच एक व्यक्ती चार-चार घरे बांधते. घरांची डिमांड वाढते. जमीन कोठून येते? वने कापून. वने कोणाची? सर्वाची. ऐपत आहे म्हणून एखादा श्रीमंत ४-६ गाडय़ा बाळगतो. प्रदूषण करतो. मी इंधनाचे पैसे भरतो ही गुर्मी! पण दहा लोकांचे इंधन तू वापरतोस. प्रदूषण मात्र त्यांच्या फुफ्फुसांत! हजारो शेतकरी १६-१६ तास पॉवरकट सहन करतात. पण मुंबईतील एक उद्योगपती ७५ लाखांचे घरगुती वीज बिल भरतो. शेतीला पाणी नाही, पण धनदांडग्यांच्या गोल्फकोर्ससाठी लाखो लिटर पाणी! हे भयंकर चित्र पुसण्यास सरकार धजावत नाही. उलट त्यात रंग भरतं!
यावर आपणच तोडगा काढायला हवा. गांधीगिरीचा व गांधी तत्त्वज्ञानाचा. आपल्या गरजेइतक्याच वस्तू घ्या. चार कपडे जोड, दोन चपला बूट पुरेसे आहेत. हाच नियम इतर बऱ्याच गोष्टींना लागू होतो. वस्तूंची मागणी कमी झाली की कालांतराने वनांवरचा भार कमी होईल हे सुज्ञ मंडळींना वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचबरोबर रिथिंक, रियूज, रिपेअर, रिसायकल हा ‘रि’मंत्र परिस्थिती निवळण्यास मदत करेल. मंडळी आपण कागदाचा वापर काळजीपूर्वक केला, तरीही वने वाचण्यास मदतच होईल. अशक्य वाटलं तरी हे सत्य आहे.
कागदनिर्मितीसाठी होणारी वृक्षकटाई हे वनांच्या ऱ्हासाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. काही पेपरमिल्स कच्च्या मालासाठी स्वत:च वृक्षांची लागवड करतात. मात्र ती लागवड पुरेशी असते का? शिवाय कागदाची मागणी वाढली (आणि ती सतत वाढतच आहे) की वनेच कापली जातात. मग बांबूवने कापल्याने पँडा बेघर झाले तरी आम्हाला पर्वा नसते. हिमालयातील वने नष्ट झाल्यामुळे भूस्खलन झाले, सुपीक माती वाहून नद्या गढूळ झाल्या, पूर आला तरीही आम्ही जागे होत नाही. कागदाचा कमी वापर+पुनश्चक्रीकरण = वनरक्षण हे समीकरण लक्षात घ्या. १ टन कागदाचे पुनश्चक्रीकरण केले तरी निदान १७ वृक्षांना जीवदान मिळते. याशिवाय ४१०० युनिट ऊर्जा वाचते, ७००० गॅलन पाणी वाचते व ६० पाऊंड प्रदूषके कमी सोडली जातात. कागदनिर्मिती ही सर्वच बाबतीत एनर्जी इंटेन्सिव्ह इंडस्ट्री आहे. आपल्यापैकी कितीतरी जण आयुष्यात एकही झाड लावत- जोपासत नाही. निदान वाचविण्यासाठी तरी हातभार लावू शकतो. आहे ना छोटीसी बात, बडी खास!
वृक्षजोपासनेचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्याला झेपेल अशा पर्यावरण निगडित संस्थेशी संलग्न व्हा. खारीचा वाटा उचला.
आपल्या देशाचे वन व पर्यावरण मंत्रालय प्रचंड तयारीने या मोहिमेत उतरले आहे. राज्यमंत्री जयराम रमेश यांनी ४६,००० कोटींचा ग्रीन इंडिया प्लॅन तयार केला आहे. तो मंजूरही झाला आहे. वनरक्षण, वनवर्धन व शाश्वत व्यवस्थापन यातून भारतातील वने ३३% पर्यंत आणण्याचा आराखडा आहे. सगळं चांगलं आहे. पण अकबर- बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सर्वाचे हात ओले करीत करीत शेवटच्या ठिकाणापर्यंत निव्वळ चार थेंब पोहोचतात. या वेळी असे होऊ नये. यासाठी आपणही जागरूक राहायला हवे. मंडळी, भारतात वनमाफिया आहेत तसे बिश्नोई आहेत. चिपको चळवळ भारतातीलच! मनात आणले तर १ बिलियन लोकांना काहीच अशक्य नाही. वने संपली तर सगळं संपेल. वने संपली तर पैसाही काहीच करू शकणार नाही. यासंदर्भात एक क्री इंडियन म्हण सर्व काही थोडक्यात पण परखडपणे सांगते.
Only after the last tree has been cut down, Only after the last river has been poisoned, Only after the last fish has been caught, Only then will you find that money cannot be eaten.
तेव्हा मंडळी ही वेळ यायच्या आधीच वनधर्माला जागा. आपल्या परीने वने वाचवण्यास हातभार लावा
.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...