देवरायांवर कुऱ्हाड

विजय प्रल्हाद सांबरे ,गुरूवार, २१ एप्रिल २०११,
महाराष्ट्रातील देवरायांचा अभ्यास १९७० च्या दशकात प्रा. वा. द. वर्तक व डॉ. माधवराव गाडगीळ यांनी सुरू केला. त्यांची ही परंपरा डॉ. कुंभोजकर, डॉ. संजय देशमुख, डॉ. अर्चना गोडबोले आदींनी पुढे नेली. महाराष्ट्रात एकूण ३५०० देवराया असल्याची नोंद अभ्यासकांनी केली आहे. त्यात तब्बल ७०० पेक्षा अधिक वनस्पतीची नोंद आढळते. असंख्य जीव- जिवाणू, वन्यजीव व विशेष करून ‘मलबार धनेश’ हा पक्षी सह्य़ाद्रीतील देवरायातच आढळतो. पर्यावरण अभ्यासक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांनी पुढे येऊन देवरायांवर काम करणे गरजेचे आहे. स्थानिकांच्या सहभागातून देवरायांची जपवणूक, संवर्धन शक्य आहे. आता गरज आहे फक्त शासकीय यंत्रणेच्या सकारात्मक प्रतिसादाची..
प्रसंग काही फार जुना नाही. कोथला गावातील प्रसिद्ध देवराई दाखविण्यासाठी शाळेतील मुलांची सहल काढली होती. उद्देश हाच होता की, सर्वदूर घरादारापासून पांदी-बांदापर्यंत व आसेतू हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत जंगल नष्ट होताहेत. ज्याचा तुम्हा-आम्हाला अभिमान आहे, असा सह्य़ाद्री उघडा बोडका होत आहे. बेसुमार वृक्षतोड होत आहे. या पाश्र्वभूमीवर वृक्षप्रेमाचे-वनश्री राखण्याचे संस्कार घडावेत, यासाठी एका खेडय़ातीलच मुलांना कोथळ्यातील देवराई दाखविण्यास आणले होते.
गावकऱ्यांच्या मदतीने देवराईतील सर्व झाडे, भूभाग, वेली, भेरली माड, प्रचंड लोध वृक्ष मुलांनी मोठय़ा उत्साहाने पाहिला. भारावलेल्या वातावरणात वेळ कसा गेला ते काही उमजले नाही. भेरली माडाचे लहानसे रोपटे पाहत असताना एका चिमुरडय़ाला सहज विचारले. ‘काय रे बाळा, आवडली का तुला देवराई?’ मनाला वाटले ही मुले प्रथमच अशी घनदाट देवराई पाहत असणार! सहलीतील एक चुणचुणीत मुलगा उद्गारला, ‘आमच्याकडे पण होती अशी देवराई. पण.. गावकऱ्यांनी मागील वर्षी नवीन देऊळ बांधायचे म्हणून देवराई तोडून लाकडे लाखो रुपयांना विकली व सिमेंट काँक्रीटचे देवालय उभारले. हिरव्यागार सावलीतून देव आता दमट मंदिरात कोंडला आहे.’ त्या मुलाने दिलेले उत्तर व वर्णन केलेली परिस्थिती जळजळीत होती. या संवादानंतर जणू सारे जण स्तब्ध झाले. सहलीतील उत्साह, आनंद नाहीसा झाला.
लागलीच चार-आठ दिवसांनी त्या मुलाच्या गावी गेलो. अकोले तालुक्यातील (जिल्हा-नगर) कोतुळ परिसरात असणारे सातेवाडी हे त्याचे गाव. आजूबाजूचा सर्व परिसर उघडा-बोडका होता, परिसरात एखादा हिरवा ठिपकासुद्धा दिसत नव्हता. सोबत गावातील तरुण कार्यकर्ता होता. जंगल, झाडे व शेती यांच्यातील जैविक संबंधच येथील भूमिपुत्रांनी नाकारल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.
मला उत्सुकता होती उद्ध्वस्त देवराई पाहण्याची! त्यासाठी पायपीट करीत दरीत उतरलो. समोर दिसले एक रंगीबेरंगी मंदिर व त्याच्या सभोवताली टणटणी ऊर्फ गुलतुऱ्याची जाळी! याला इंग्रजीत ‘लँटाना’ असे म्हणतात. ही परदेशी वनस्पती पसरणे हे तेथील अधिवासाला, जैवविविधतेला धोकादायक असते. या जाळ्यांमधून चार-दोन भेरली माड डोकावत होते. आजूबाजूचे साथीदार सोडून गेल्यामुळे त्यांचे जणू तेजच नाहीसे झाले होते. नारळ माडवर्गीय झाडांना लागणारा दमटपणा देवराई तुटल्यामुळे नष्ट झाला होता. देवराईच्या पडीक क्षेत्रात भटकत होतो. मनात कल्पना करीत होतो. इथे एखादे जंगली आंब्याचे, हिरडय़ाचे, बेहडय़ाचे प्रचंड मोठे वृक्ष असतील. एखादा दुर्मिळ लोध किंवा राळधुपाचा वृक्ष असेल. विविध वेली, झुडपांनी ही देवराई जणू काही एकत्र विणलेली असेल. देवळाच्या परिसरात प्रचंड ओंडके येथील वृक्षसंपत्तीचे अखेरचे साक्षीदार म्हणून पाहावयास मिळाले.
मंदिरातील पुजारी व इतर गावकऱ्यांशी झालेल्या संवादातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. देवराईतील काडीलाही हात लावायचा नाही, अशी संवर्धन संस्कृती जपणारे सांगत होते की, बाहेरगावच्या एका भक्ताने चार गावकऱ्यांना हाताशी धरून मंदिर उभे करण्याचा घाट घातला आणि तेही देवाचीच राई तोडून! गावकीच्या मताचा-निर्णयाचा विचार न करता देवराईवर शेकडो कुऱ्हाडी, करवती पडल्या. वनांचे रक्षण करणारी शासकीय यंत्रणा, लाकूड वखारीवाले यांच्या संगनमताने एक उत्तम देवराई पाशवी वृत्तीच्या भक्तांची बळी ठरली. घटना क्रमवारपणे सांगणारे व्यथित होते. पण एकत्र येऊन विरोध करण्याचे मानसिक बळ त्यांच्यात दिसले नाही. हा गाव आहे चौदापेक्षा अधिक वाडय़ा वस्त्यांचा. त्यामुळे देवराई साऱ्यांचीच असणार. शेकडो वर्षे नियम धर्म पाळून आजवर राखली. मात्र दडपशाहीपुढे संवर्धन परंपरा हतबल ठरली.
हा अनुभव काही एकाच गावाचा नाही. देशभर देवरायांची कत्तल इंग्रजांच्या आमदानीपासून सुरू आहे. कागद गिरण्या, फर्निचर्स, घरे, रेल्वेरूळ टाकण्यासाठी तसेच, इतर कारणांसाठी लाकडाचा अमर्याद वापर सुरू झाला. त्यातच देवराया बळी पडू लागल्या. गावातील सामूहिक निर्णय प्रक्रियेची जागा बहुमताने घेतली. लोकशाहीतील अशा विकृतींनी सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास चालविला आहे. जल, जंगल, जमीन ही उपजीविकेची साधने प्रदूषित होत आहेत. स्व:मालकीच्या गोष्टींना जेवढे जपले जाते, तितके गावकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याला देवराया, पवित्र वृक्ष तरी कसे अपवाद ठरणार? विकास करावयाचा म्हणजे जुने ते टाकावू ठरवून नष्ट करावयाचे व अशाश्वत अशा आधुनिक तंत्राचा वापर करावयाचा, अशा अविवेकी मनोवृत्तीतून विनाश होत आहे.
मागील वीस वर्षांपूर्वी भीमाशंकर परिसरातील घोड नदीच्या उगमस्थानी असणाऱ्या आहुपे गावातील देवराई नष्ट करण्याचा घाट घातला, पण जागरूक कार्यकर्त्यांनी तिला वाचविले. मात्र त्या मुलांच्या गावातील देवराईला कोणी वाली मिळाला नाही. अशा हजारो देवराया बळी पडल्या आहेत, अजूनही तुटत आहेत. मूळ जंगलाचा ठेवा नष्ट होत आहे. कोण वाचविणार यांना? एक गोष्ट मात्र खरी की, सुरुवात गावकऱ्यांनाच करावी लागेल. एकटय़ाने नाहीतर समुदायाने हा जैवविविधतेचा ठेवा राखावा लागेल. वेळ पडली तर चिपको आंदोलनाप्रमाणे झाडांना मिठय़ा मारून बसावे लागेल. त्यासाठी गरज आहे निश्चयाची, सामूहिक इच्छाशक्तीची व मानसिक बळाची!
Credit:Loksatta 

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...