जैवसंपदा हाच आयुष्याचा विमा!

-डॉ.अंकुर पटवर्धन ,( सकाळ )

संपन्न जैवविविधता असलेल्या देशात भारताचा समावेश असणे अभिमानास्पद आहे. पण हे जैववैविध्य टिकविण्यासाठी आपल्याला कसून प्रयत्न करायला हवेत.
पर्यावरण
संवर्धन, जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) यांसारखे शब्द सध्या खूपच परवलीचे झाले आहेत. एकविसाव्या शतकात जैवसंपदेशी संबंधित उद्योग
एकूण अर्थव्यवहाराच्या 40 टक्के उलाढाल घडवतील असा अंदाज आहे. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण संवर्धन वेळीच केले नाही, तर भविष्यात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल. जैवविविधतेची खरी किंमत एखाद्या प्रजातीचे तिथले पर्यावरण टिकवून ठेवण्यात किती योगदान आहे, त्या प्रजातीमुळे इतर जीवनावश्यक गोष्टींना कसा फायदा होतो, या बाबींचे विश्लेषण केल्यासच कळून येईल. उदा. अनेक प्रकारची झाडे-झुडपे, वेलींनी समृद्ध असे जंगल टिकून राहिले, तर फळमाशा, मधमाशा, फुलपाखरे, पक्षी, प्राणी तर वाढतीलच; पण त्यामुळे परागीभवन होऊन आपल्या नारळी, पोफळी, आंबा, काजू यांसारख्या बागाही टिकून राहतील. असेही आढळून आले आहे, की परिसरातल्या टेकड्या, डोंगर यावर हिरवे आच्छादन असल्यास पाण्याचे झरे, डोह, विहिरी लवकर आटत नाहीत.
जगातल्या संपन्न जैवविविधता असलेल्या मोजक्या प्रदेशांपैकी भारत एक आहे. थरसारखा वाळवंटी प्रदेश, हिमालयाच्या सान्निध्यात असलेल्या सूचिपर्णी वृक्षांची जंगले, तसेच नेपाळच्या सीमेजवळील तराईचे प्रदेश आणि ईशान्येकडील ब्रह्मदेशापर्यंत पसरलेली निबीड अरण्ये, सागराजवळील खारफुटीची राने आणि अंदमान-निकोबार, लक्षद्विपसारखी द्विपकल्पे यांसारख्या बहुविध परिसंस्थांमुळे भारतात विपुल जैवसंपदा आढळून येते. पश्चिमघाट किंवा सह्याद्रीच्या डोंगररांगा यापैकीच एक. सागराचे सान्निध्य, कमी-जास्त पर्जन्यमान, मृदाप्रकार, भूशास्त्रीय स्तर यांचा वनांवर झालेला परिणाम त्यामुळे निर्माण झालेली विविधता याचा एकत्रित परिणाम म्हणून येथे अधिवासांची विविधता आहे. घाटमाथ्यांवरील जांभ्याची पठारे किंवा सडे ही अशीच एक नाजूक परिसंस्था आहे. "सिरोपेजीया'सारख्या दुर्मिळ वनस्पती प्रजाती, काही विशिष्ट बेडकांच्या प्रजोत्पादनाची ठिकाणे अशा सड्यांवर आढळून येतात. दुर्दैवाने अशी पठारे लोह, बॉक्साईटसारख्या खनिजसंपत्तीने विपुल असल्याने खाणींची शिकार होत आहेत.
भारतात पिकांच्या, पाळीव प्राण्यांच्या हजारो जाती आढळून येतात. त्या काही अचानक किंवा अपोआप तयार झाल्या नाहीत. वर्षानुवर्षे स्थानिक जमातींनी किंवा शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाला अनुकूल जाती निवडूनत्यांची प्रयत्नपूर्वक जोपासना केली. म्हणूनच हा जैवविविधतेचा फुलोरा फुलला. सद्यःपरिस्थितीत केवळ उत्पादनवाढ हे एकच ध्येय समोर ठेवल्याने इतर घटकांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आर्थिक उत्पादन देणाऱ्या वाणांच्या भरमसाट प्रचाराच्या नादात स्थानिक वाण हळूहळू कालबाह्य होत चालले आहेत. विशेषतःरोगप्रतिकारक शक्तीसाठी अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांचा संकर किंवा जनुकीय संस्करण जुने पारंपरिक वाण वापरून करतात. त्यामुळे असे स्थानिक वाण गमविणे म्हणजे कुऱ्हाडीवर स्वतःहून पाय मारून घेण्यासारखे आहे.
जैवविविधता ऱ्हासाची प्रमुख कारणे अशी :
1) एखादी जाती हळूहळू नष्ट होणे हे नैसर्गिक असले तरी गेल्या काही दशकांत जाती नष्ट होण्याच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या 25 वर्षांत जगातील जैवविविधतेचे 15 टक्के नुकसान झाले आहे अशा जाती नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहेत. 2) जाती नष्ट होण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे जातींच्या नैसर्गिक अधिवासात झालेली घट. विशेषतः पश्चिम घाटात शहरीकरणामुळे जंगलाचे प्रमाण 50 टक्क्यापेक्षा जास्त नष्ट झाले आहे. त्यामुळेच माणसे आणि वन्यप्राणी यातील संघर्ष वाढीला लागला आहे. जुन्नरजवळ बिबट्या, भीमाशंकरजवळ रानडुकरे, सिंधदुर्गात हत्ती मनुष्यवस्तीत, बागायतीत धुडगूस घालत आहेत. 3) जैवविविधतेच्या ऱ्हासाचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, आर्थिक फायदा नुकसानीच्या हिशोबाशी असणारे सरळ नाते दाखविण्यात आलेले अपयश. कदाचित म्हणूनच की काय, यातून धडा घेऊन कर्नाटकातल्या "अधनाशिनी' नदीच्या भोवताली वसलेल्या स्थानिक लोकांनी मच्छीमारांनी जीवशास्त्राच्या शिक्षकांना नदीतील कालवे, तिसरे, शिंपले, मासे, झिंगे इत्यादींच्या अभ्यासास मदत केली. त्यातून असे लक्षात आले, की यांच्या विक्रीतून होणारी आर्थिक उलाढाल वर्षाकाठी सुमारे पाच कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे नदी परिसरातील जैवसंपदेचे नुसतेच संरक्षण संवर्धनच साध्य झाले नाही तर प्रदूषणकारी कारखाने तेथून हटवावे लागले.
भारतातील सर्व जीवसंपदा काही थोड्या राष्ट्रीय उद्याने अभयारण्यातच फक्त सुरक्षित ठेवता येणार नाही. त्यासाठी संरक्षित केंद्रांचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे. देवराया, शेती, नद्यातील डोह, पाणवठे एवढेच नव्हे, तर शहरांमधूनही (टेकड्या, शैक्षणिक संस्थांचे परिसर) जीवसंपदा आहे आणि त्याच्याही संरक्षणाची आवश्यकताआहे. खासगी हितसंबंधाची जपणूक, लोकांपर्यंत चळवळ नेणे यांसारख्या गोष्टींमधून जीवसंपदेचे रक्षण होणारआहे.
‍ ‍‍ ‍ ‍ ‍ ‍‍‍ ‍‍

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...