परिसर : रानभाज्या हद्दपार

पावसाळ्याच्या सुखद दिवसात रानावनात राहणाऱ्या वनवासी, गिरीवासी, आदिवासी मंडळींची तरबेज नजर हुडकत असते रानभाज्यांना! आषाढ सरला, श्रावणसरी कोसळू लागल्या की, मग डोंगरात अन् रानवाटांवर, शेतांच्या बांधांवर आणि परसदारीसुद्धा कोवळ्याशार पोपटी रंगांची दुनिया अवतरते. त्या पावसाळी वनस्पतींमध्ये अनेक खाद्योपयोगी वनस्पती असतात. कौला, टाकळा, भारंग, केनी, कुर्डू, शेंडवेल, चिचारड, शेवळं, काकडं, मेकी, नाना बोंडाचा पाला, तेलपट, दिंडी/दिणी, फोडशी आणि इतरही अशाच कितीतरीरानभाजा एका विशिष्ट पद्धतीनं वापरल्या जातात. बिरडय़ा, कणगरं, बाफळी, भुईफोड, पेंढरं अशा आणखीहीमंडळींची त्यात भर घालता येते. यातील अनेक भाज्या जरा कडसर चवीच्या असतात, पण तरीही पावसाच्यादिवसात त्या चार-दोन वेळा तरी खायलाच हव्यात, असं वडीलधारी मंडळी सांगतात. जरा बदल म्हणून आणिकाही प्रमाणात आरोग्यरक्षक अशा या रानभाज्या ऐन पावसाळ्यात रानातच उगवतात. त्या मिळण्यासाठी जमीन नांगरावी लागत नाही, खतं-माती, शेतीरसायनं वापरावी लागत नाहीत. त्यातील फारच क्वचित रानभाज्यांवर रोगकिडींचा प्रादुर्भाव झालेला असतो
आदिवासींची पर्वणी
शहरं आणि मोठी गावं यांच्यापासून खूप दूर लहान गावं, वस्त्या, वाडय़ा, पाडे अशा ठिकाणी रानावनात हिंडून गोळाकेलेल्या रानभाज्या बाजारात विकायला येतात. हे सारे गिरीवासी-वारली, कातकरी, ठाकर आदी मंडळी स्वत: यारानभाज्या खातातच. त्यातूनच त्यांना पावसाळी आजारांवर मात करता येते, जीवनसत्त्व-क्षार आणि काही पोषकद्रव्येही त्यांना मिळतात. त्यांच्या अशा परंपरागत ज्ञानाचा त्यांना खूप उपयोग होतो. कंदमुळं, फुलं, फळं, पानंअशा अनेक गोष्टी आदिवासींच्या आहारात असतात. त्यांचं दैनंदिन जीवन आणि थोडंफार अर्थकारणही यापावसाळी रानभाज्यांशी निगडित असतं. कारण अशा रानभाज्या जवळच्या गावांत विकून त्यांना चार पैसेमिळतात. जून-जुलैपासून सुरू झालेला रानभाज्यांचा हंगाम ऑक्टोबपर्यंत चालू असतो. मात्र पावसाळ्याच्याआरंभीचा, पाऊस स्थिरावल्यावर मिळणाऱ्या आणि वर्षांराणीला निरोप देण्याच्या काळात मिळणाऱ्या प्रदेशपरत्वेवेगवेगळ्या असतात.
मिताहार (डाएटिंग), चवीत बदल, परंपरागत (एथनिक) अन्नपदार्थ यांना बरे दिवस येऊ घातले आहेत, म्हणूनपडेल ती किंमत देऊन बऱ्याच वेळा या भाज्या विकत घेतल्या जातात. अशा भाज्या विकून जास्त पैसे मिळतात, हे लक्षात आल्यामुळे वनवासी मंडळी अधिकाधिक भाज्या रानावनातून अक्षरश: ओरबाडून गोळा करतात. त्यांचीअपुरी वाढ आणि खूप उपटल्याने होणारा समूळ विनाश यांची फिकीर ते करीत नाहीत. त्यामुळे काही रानभाज्याआता अजिबात मिळेनाशा झाल्या आहेत, तर काही रानभाज्या दुर्मिळ होत चालल्या आहेत.
हवामानात झालेले बदल, तापमानवाढ, अनियमित अपुरा पाऊस, जास्त दाहक उन्हाळा यामुळे निसर्गचक्रांवरहीप्रतिकूल परिणाम होऊ लागले आहेत. त्यामुळेही रानभाज्यांच्या उपलब्धतेवर निश्चित परिणाम होतो आहे. यारानभाज्या स्वत: खाऊन पोषक द्रव्ये मिळविण्याऐवजी अशा भाज्या विकून चार पैसे मिळवणं हेच या आदिवासींनामहत्त्वाचं वाटू लागलं आहे. त्यामुळे त्यांच्या कुपोषणात भरच पडत आहे. जास्त पैशांसाठी जास्त भाज्या उपटल्याजात असल्याने त्या अधिकाधिक दुर्मिळ होत चालल्या आहेत. त्यांच्या जिविधतेवरचं (बायोडायव्हर्सिटी) हे संकटदिवसेंदिवस अधिक गहिरं होत चाललं आहे. या महत्त्वाच्या गोष्टीकडे कोणीच गंभीरपणे पाहात नाही, हे आणखीएक दुर्दैव!
गेल्या पाचशे वर्षांत..
सुमारे पाचशे वर्षांपूर्वी ख्रिस्तोफर कोलंबस हा नव्या जगात पोहोचला. त्या विशाल भूप्रदेशात माया-इंका-ॅझटेक-रेड इंडियन्स-एस्किमो अशा अनेक वंशांचे आणि संस्कृतींचे मानवी समाज हजारो वर्षे राहात होते. त्यांच्या भाषा-लिपी-धर्म-संस्कृती-चालीरीती आणि मुख्य म्हणजे विविध वनस्पतींची शेती आणि अनेकवनस्पतींचे केले जाणारे उपयोग यामुळे विस्तारवादी धर्माध पाश्चात्त्यांनाही भुरळ घातली. तंबाखू, रबर, बटाटा, मिरची, मका, टोमॅटो, भुईमूग, दालजामी (ऑल स्पायसेस) आणि इतरही अनेक वनस्पती युरोप आशियात नव्याने दाखल झाल्या. अननस, सीताफळ, पेरू, लोणफळ (ॅव्होकॅडो) अशा अनेक फळांचा आपल्याला परिचयझाला. पाहुणे म्हणून आलेल्या या वनस्पती इथेच स्थायिक झाल्या. आतातर या वनस्पती परदेशी आहेत, हे सांगूनही आपल्याला पटत नाही.
म्हणजेच पाचशे वर्षांपूर्वी झालेल्या अशा वनस्पतींच्या आदानप्रदानानंतर एकही नवी वनस्पती मानवाच्याआहारात नव्याने समाविष्ट झालेली नाही. उलट पिढय़ान्पिढय़ा अन् शतकानुशतके आपल्या आहारात थोडय़ाप्रमाणात आणि विशिष्ट हंगामात समाविष्ट असलेल्या वनस्पती, आपल्या आहारातून केव्हाच वजा झाल्या आहेत. त्यांची ओळख शहरी माणसं विसरली आहेत. आता ग्रामीण मंडळींनाही एकेकाळच्या या परिचित वनस्पतीअपरिचित होऊ लागल्या आहेत. गिरीवासी-वनवासी मंडळीही शहरी लोकांप्रमाणेच कांदा, बटाटे, टोमॅटो, सिमलामिरची, कोबी, फ्लॉवर खाऊ लागल्याने त्यांनाही या खाद्यवनस्पती ओळखीच्या राहणार नाहीत. खरंतर यारानभाज्यांपैकी काही निवडक भाज्याचं आहारमूल्य, आहारघटक पोषणमूल्यांचा जाणत्यांनी अभ्यास करायलाहवा. त्यातील अधिक उपयुक्त वनस्पती लागवडीखाली आणायला हव्यात. त्याचं महत्त्व सर्वाना पटवून द्यायचे प्रयत्न
‍ ‍ व्हायला हवेत. हे आपले परंपरागत ज्ञान पुन्हा वापरात आणायला हवं.
वापरातील विविधता
रानअळू, सुरण, खरपुडी/खरसुंडी, हनुमान बटाटा, कणगटं हे कंद आहेत. टाकळा, कौला, तेलपट, फोडशी, भारंगआदी पालेभाज्या आहेत. शेवळं, मोहोर हे फुलोरे आहेत. कुडा, शेवगा, भारंग, भोपळा, हादगा/अगस्ता ही फुलंआहेत. करवंद, भोकरं, अंबाडा, आळू, लेंडी जांभळं, आमटं, कर्टुली, ओंट, काकड, मेकी ही फळं आहेत. बांबूचे दाणे, कमळाच्या बिया अशा काही बियाही खाद्य आहेत. खाजकुयरी/खाजकुयलीच्या बिया त्यांचे चूर्णही पौष्टिक असतं. रानभाज्यांची ही श्रीमंती आपल्या देशात विपुल आहे, पण या साऱ्या रानखाद्य वनस्पतींचा पद्धतशीर अभ्यासकरून, त्यांची शास्त्रीय नावं, आढळस्थाने, त्या रानवनस्पतींपासून खाद्यपदार्थ तयार करावयाच्या कृती, त्यावनस्पती अचूकपणे ओळखण्यासाठी रेखाचित्रे प्रकाशचित्रे असणारे एकही पुस्तक उपलब्ध नाही. खरंतर एखाद्या अभ्यासू वनस्पतीशास्त्रज्ञाने पीएच.डी.साठी संशोधन प्रकल्प म्हणून असा ग्रंथ तयार करायला हवा.
सुमारे - महिन्यांचा हा रानभाज्यांचा हंगाम टिकतो. भाताला लोंब्या पडल्या, शेतं पिवळी दिसू लागली की, रानभाज्या दिसेनाशा होतात। त्यांचा आस्वाद घेतलेला असला तर त्या स्मृती घोळवत, पुढच्या हंगामापर्यंत त्यांची वाट पाहणं एवढंच आपल्या हातात असतं.

सौजन्य : प्रा. प्र. के. घाणेकर,मंगळवार, ७ सप्टेंबर २०१० (दैनिक लोकसत्ता)

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...