रंगांच्या लाटांवर फुलांचे सोहळे!

सौजन्य :सीमंतिनी नूलकर (लोकसत्ता )
seema_noolkar@yahoo.co.in This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

एकापाठी एक उमलणाऱ्या असंख्य फुलांच्या लाटांचा हा सगळा पुष्पसंभार सांभाळता सांभाळता कासच्या सडय़ाची तारांबळ उडत असते. गेंद, तेरडा, कवल्या, सीतेची आसवे, जांभळी मंजिरी या फुलांच्या आणि त्यांच्या रंगांच्याही लाटा एकामागून उठत असतात.
कासच्या सडय़ावरून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या राजमार्गावर एक तळे आहे. कमळाचे तळे म्हणून याची ओळख आहे. या तळ्यावर शुभ्र पाकळ्यांवर नाजूक लव असलेल्या कमळसदृश पाणफुलांचा तरंगता रुजामा आहे. ही एक प्रकारची पाणवनस्पती आहे. नाव कुमुद! निमेसेएसी कुटुंबातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव एन-इंडिका! यांना वॉटर स्नो फ्लेक असेही म्हणतात. पण ही फुले म्हणजे वॉटर लीली किंवा कमळ नाही. मुळातच कमळ आणि वॉटर लीली यातच समजुतीचा गोंधळ आहे. कमळ, वॉटर लीली आणि कमळसदृश पाणफुले यांच्या रचनेत, रहिवास-अधिवास यामध्ये मूलभूत फरक आहे. कासच्या तळ्यावर असलेली ही कुमुदची फुले सध्या बहरात आहेत. त्याच्या रुजाम्यावर हलकेच मधेच शुभ्र धुके उतरून येते आणि या वेळी मग हा नजारा केवळ पाहण्यासारखा होतो.
वर्षां ऋतूबरोबर सारा पश्चिम घाटच एखाद्या हिरवी साडी ल्यायलेल्या तरुणीप्रमाणे सुंदर होतो. या हिरव्या शालूवर मग कलाकुसर, कशिदाकारी करत तऱ्हेतऱ्हेची रानफुले येतात. ‘फुलं येलांची नक्शी हाये’ असाच काहीसा हा थाट! या साडीवर बुंदके आहेत जरतारीचे! फ्लेमिंजिया ग्रॅसिलिस असे या जरतारीचे शास्त्रीय नाव! याला काठ आहेत ते सोनकीचे! हिच्यातही सोनकी, सोनसरा, सोनटिकली, सोनकाडी, सोनसरी, सोनघंटा.. अशा किती नावाफुलांच्या या सोनेरी लाटा! निळ्या, जांभळ्या, पांढऱ्या रंगांचा तर इथे नित्य उत्सव! फुलकाडी, फुलबाजी, दीपकाडी यांची आतषबाजी पाहावी, का निलमणी, निलवंती, निलांबरीच्या निळाईत न्हावून निघावे?
कासच्या सडय़ावरील फुलांच्या या खजिन्यातील कुणा-कुणाची नोंद घ्यावी.
काससडय़ावर अनेक दुर्मीळ फुलेही आहेत. त्यापैकी उडी चिरायत आणि मदाम ही दोन! एक्झाकम ऊर्फ उडी चिरायतचे फूल तर कमालीचे देखणे! खरेतर ही बहुगुणी वनस्पती! रोगनिवारक म्हणून, विषाचा उतारा म्हणून हिचा उपयोग! शस्त्रक्रियेदरम्यानही तिचा वापर करतात. तिच्या मुळात एक विशिष्ट रंगद्रव्य आहे. ज्याचा जर्मनी, स्वित्र्झलडमध्ये अल्कोहोलिक ड्रिंक्समध्ये वापर करतात. अशा या चिरायतचे फूल भलतेच देखणे! पांढऱ्या रंगाच्या या फुलाच्या पाकळ्यांची टोके जणू जांभळ्या रंगात बुडवल्यासारखी!
‘मदाम’चे झाड उंचनींच! याच्या फुलाचा चेहरा हलका मेकअप केलेला आणि तोरा मात्र इस्त्रीचा! पाकळ्यांना जॉर्जेट-शिफॉनचा तलमपणा आणि चुडीदार फील! तशा मदाम येता-जाता नजरेला पडत नाहीत. पण जिथे असतात तिथे ऐटीत उभ्या असतात. फ्रेश! कधीही चुरगळलेल्या, विस्कटलेल्या नाहीत. कुणासाठी थांबल्याचा, फुलण्याचा आविर्भाव नाही. स्वत:साठी फुलणे हेच मदामचे स्वभाववैशिष्टय़!
पाऊस जेव्हा धुवाँधार कोसळत असतो तेव्हा या सडय़ावरच्या झऱ्या-ओहळातून ‘वायतुरा’ मान वर काढतो. वायतुरा म्हणजे आपोनोगेटॉन सातारेन्सिस. कासच्या सडय़ाला जागतिक वारसा यादीवर नामनिर्देशित करण्यात या फुलाचा सिंहाचा वाटा आहे. आख्ख्या जगात हा वायतुरा फक्त सातारा जिल्ह्य़ात कास सडय़ावरच आहे. म्हणूनच सातारेन्सिस! वायतुऱ्याचा रंग तर असा की, खाऊनच टाकावा. या वायतुऱ्याचा नखराच न्यारा! पण याही वनस्पतीवर आता गदा आलेली आहे.
काही फुलांच्या रचना मनोवेधक असतात आणि रंग असा की, पान का फूल, फूल का फळ असा संभ्रम व्हावा. अशीच एकाची ओळख शेजारी छायाचित्रात दिली आहे.
युफोर्बिया लिटा! याला सडय़ावर ‘दुधी’ म्हणतात. याचे हिरवट पोपटी फूल पाहून-
‘पानांच्या कानात फुलांचे डूल,
म्हणूनच तर पडते रानाला भूल’

असा अनुभव येतो.
गेल्या काही वर्षांपर्यंत कासचा सडा एकटाच एकांताची उब लपेटून फुलांच्या सहवासात धुंद होता. काळोखात निळाई वितळलेला हा प्रदेश तसा अज्ञातच होता. या अज्ञाताच्या कुशीत कितीएक बीजे रुजत होती, फुलत होती. या सडय़ावरची एकांताची वेल बहरलेली असायची. त्यावर एखादे चुकार स्वप्नाचे फूल उमलायचे. रॉय किणीकरांच्या ‘वितळली निळाई काळोखातील..’ या ओळींचा अर्थ आम्हाला याच सडय़ावर उमगला. पण आता चित्र पालटले आहे. फुले तोडण्यासाठी, तुडवण्यासाठी, ओरबाडण्यासाठी असतात, असा समज व्हायला लागलाय. कर्णकर्कश गोंगाटात कोवळ्या फुलांच्या हाका अस्फुट होत आहेत. कित्येकांनी थकून कायमसाठी मानाही टाकल्या आहेत. आता फुलांचे सुवास नाकापर्यंत पोहोचतच नाहीत. फुलांचे नखरे खुणावत नाहीत. रंग लोभावत नाहीत. सडय़ाचा एकांत विस्कटून गेलाय. अस्तित्व टिकविण्यासाठी चाललेली फुलांची अनिवार आर्जवं हृदयाला पीळ पाडत नाहीत.
खरंतर या रानफुलांची इतकीच आर्जवं आहेत-
सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास
अधिक काही मिळविण्याचा करू नये अट्टहास
सुवास, पाकळ्या, पराग, देठ, फूल इतकीच देते ग्वाही
अलग अलग करू जाता, हाती काहीच उरत नाही.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...