काचेच्या बिल्डिंग पक्ष्यांच्या मुळावर


एखाद्या आरशाला किंवा काचेला आजही कुठलेही पक्षी अजूनही समजू शकले नाही. मानववस्तीतच राहणारी चिमणीसुद्धा आरशाला आजही भ्रमित होते. आजही काचेच्या प्रतिबिंबात अनेक पक्षी आदळून जखमी होत आहेत. अशी शोभा, सजावट काय कामाची, जे सृष्टिसौंदर्याचे, निसर्गचक्राचे अभ्यंग असे निर्दोष पक्ष्यांना इजा पोहोचवत असेल! दोन वर्षांपूर्वीचा हा प्रसंग. ऑक्टोबरचा पहिला आठवडा. दुपारची वेळ. निगडीत माझ्या ऑफिससमोरील कोहिनूर आर्केडमध्ये काही कामानिमित्ताने गेलो होतो.तिथून परत निघताना माझे लक्ष एका माणसाकडे गेले. तो खाली वाकून काही हिरवंगार उचलत होता. उत्सुकतेने मी जवळ गेलो तर तो म्हणाला, ‘हे काय आहे माहीत नाही. आता माझ्या पायाखाली आले असते’-
मी लगेच ओळखले, ‘हा तांबट नावाचा पक्षी आहे. इंग्रजीत याला Crimsonbreasted Barbet किंवा Coppersmith म्हणतात. शास्त्रीय नाव मेगालायमा हिमॅसेफाला (Megalaima haemacephala) आहे. ग्रीक शब्द `megalaima चा अर्थ रुंद कंठ असलेला असा होतो. हा अतिशय सुंदर, देखणा पक्षी वनात आणि उद्यानात राहतो. याचा आवाज आपण बऱ्याच वेळा ऐकलेला असतो. पण दिसणे सामान्य नजरेला कठीणच! पुण्यातल्या तांबट आळीत तांब्याच्या भांडय़ांवर ठोके देताना जसा आवाज येतो, तसाच ‘टुक्-टुक्’ आवाज हा पक्षी काढतो. म्हणून याला मराठीत ‘तांबट’ आणि इंग्रजीत Coppersmith म्हणतात. 


याचा आवाज दूपर्यंत पोहोचतो. बऱ्याचवेळा हा आपल्या जवळच्या झाडावर असूनही खूप दुरून आवाज येतोय असेच वाटते. हा ‘टुक्-टुक्’ किंवा ‘पुक्-पुक्’ आवाज करताना मान इकडे-तिकडे फिरवत असतो. त्यामुळे आपल्याला तो कुठून येतोय हे कळत नाही. त्याचे ‘टुक्-टुक्’ किंवा ‘पुक्-पुक्’च्या आवाजाचा आकडा मिनिटाला १०८ ते १२१ वेळा, तर जास्तीत जास्त २०४ पर्यंत जाऊ शकतो! हा आवाज चोच न उघडताच करत असतो! प्रत्येक ‘टुक्-टुक्’ला गळ्याभोवतीची कातडी फुलवतो-आकसतो, तेव्हा त्याची मान रबरी चेंडूसारखी उसळत असते.
तांबटच्या मेनूकार्डात वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, अंजीर या फळांबरोबर कधीतरी फुलपाखरे, कीटक, फुलांच्या पाकळ्यांचाही समावेश होतो. फळ खाण्यात हे एवढे पटाईत असतात की, रोज स्वत:च्या वजनाच्या दीडपट ते तिप्पट वजनाची फळं फस्त करतात. यामुळे वड, पिंपळ, उंबर, अंजीर वर्गातल्या झाडांचा बीजप्रसार दूपर्यंत होतो. असा फळांच्या झाडांना भेट देणारा हा पक्षी जमिनीवर, तेही भरगर्दीच्या बिल्डिंगमध्ये कसा? वरून पडला असेल? त्या माणसाने समोरच्या पायऱ्यावर तांबटला ठेवले आणि निघून गेला; परंतु तांबट काही उडाला नाही. म्हणजे तो जखमी झाला होता. त्याला असेच सोडून जायला माझा पाय तिथून निघेना. परत कुणाच्या पायाखाली आल्यास तो इवलासा जीव चिरडला जाईल किंवा मांजर त्याचा फडशा पाडेल. या सर्व धोक्यातून वाचलाच तर कावळे त्याला टोचून-टोचून मारतील. माझ्या मनात त्याला वाचवायची तळमळ वाढायला लागली. मी त्याला अलगद उचलून हातात घेतले. तेव्हा भीतीने तो थरथर कापत होता. एवढय़ातच त्याने विष्ठेची पिचकारी सोडली. कदाचित आपला जीव वाचवण्यासाठी असे केले असावे. विष्ठेमुळे घाण झालेल्याच्या हातातून सुटण्याची ही एक क्लृप्ती होती. त्याला काय माहीत मारणाऱ्याचे हात कोणते आणि वाचवणाऱ्याचे कोणते?


खूप लांबून पाहायला मिळणारा हा पक्षी माझ्या हातात होता. हिरव्यागर्द झाडांमध्ये मिळून-मिसळून जाणाऱ्या तांबटला इतक्या जवळून मी प्रथमच पाहात होतो. त्याला हातावर घेऊन मी तर अगदी रोमांचित झालो. त्याला उजव्या हाताच्या बोटावर घेतले. एखाद्या फांदीवर बसतो तसे त्याने आपल्या पायाने माझ्या बोटावर पकड घेतली. दोन्ही पायात पुढे दोन व मागे दोन, अशी चार-चार बोटं होती. त्याची तीक्ष्ण नखे मला चांगलीच टोचत होती. त्याला बोटावर घेताच त्याचे थरथरणे थांबले. आकाराने चिमणीपेक्षा मोठा, चणीने बुटका, तर शेपटी भुंडी होती. जी उडताना त्रिकोणी दिसते. याच्या गळ्यावर आणि डोळ्यांभोवती पिवळा रंग होता. पोटाच्या बाजूस पांढरा रंग होऊन त्यावर हिरव्या रेघा होत्या. छाती आणि कपाळावर लाल पिसं आणि पाठ गडद हिरव्या रंगाची होती. काळ्या मजबूत उघडय़ा चोचीतून लांब व पातळ जीभ स्पष्ट दिसत होती. चोचीच्या वर मोठय़ा लांब, तर खाली छोटय़ा काळ्या मिशा होत्या. कपाळावर लाल-चुटूक टिळा त्याच्या देखणेपणात भर टाकत होता. या वेगवेगळ्या रंगांमुळे मनुस्मृतीत तांबटचे वर्णन असे केले आहे..
मणिमुक्ताप्रवालानि हृत्वा लोभेन मानव:।
विविधानि च रत्नानि जायते हेमकर्तृषु।।
या हिरव्या पक्ष्याला लाल, पिवळ्या चट्टय़ांबरोबर चोचीच्या खालून डोक्यावर गेलेल्या काळ्या पट्टय़ामुळे मनुस्मृतीमध्ये ‘हेमकर्तृ’ म्हणजे रत्नचोर म्हटले आहे. हिरवा पाचू, पिवळा पुष्कराज, लाल मुंगासारखे रत्न जणू या रंगाच्या रूपात चोरले आहेत, असा हा ‘ज्वेलथीफ’!
विणीच्या काळात हा लाल टिळा आणखी आकर्षक दिसतो. नर-मादी दोघेही सारखेच दिसतात. पांगारा, शेवगा, काटेसावर, शिरीष, आंबा, चिंच, आफ्रिकन टय़ुलिप (पिचकारीचे झाड) या झाडांच्या वठलेल्या फांद्यांमध्ये, नेहमी फांदीच्या खालच्या बाजूला आपल्या मजबूत चोचीनं नर-मादी दोघंही खोदून ढोली तयार करतात. घरटय़ात जाण्यासाठी नळीसारखा प्रवेशमार्ग बनवला जातो. या नळीच्या शेवटी अंडय़ासाठी कोठी बनवतात. जानेवारी ते जून हा विणीचा काळ असतो. मादीला मीलनासाठी नर तांबट मादीला वड, पिंपळ, जांभूळ व इतर वेगवेगळ्या प्रकारची फळं भरवतो. या फळात कधीकधी आपल्या इथे स्थानिक नसलेले वृक्ष बॉटलब्रशची फळंही मादीला देतो. ढोलीत मादी ३-४ अंडी देते. नर-मादी दोघंही मिळून अंडी उबवतात. साधारण दोन आठवडय़ांनंतर पिल्लं बाहेर येतात. आई-बाबा दोघे मिळून पिल्लं वाढवतात. दोन पिल्लेच असल्यास वाढ लवकर होते व जगण्याचे प्रमाणही वाढते. पिल्ले मोठी होऊन उडून गेल्यावरसुद्धा आई-बाबा त्या ढोलीतच राहतात आणि वर्षांनुवर्षे तीच ढोली वापरतात. माणसांसारखी अनेक घरांची चैन करत नही. वसंत आणि ग्रीष्म ऋतूत यांचा आवाज बुलंद होतो. पावसाळा येताच आवाज मंद व्हायला लागतो आणि हिवाळ्यात तर अगदी क्षीण, शक्तिहीन होऊन जातो. पुन्हा वसंत (बसंत) आल्यावर आवाज वाढतो. म्हणून कदाचित हिंदीत याला ‘बसंता’ असे म्हणतात.
‘‘शरद, शिशिर, हेमन्त मो, भये बसंता मौन।’’
ही म्हण त्यामुळेच प्रसिद्ध आहे. ग्रीष्म काळात तळपत्या उन्हापासून वाचायला जेव्हा सर्व पशू-पक्षी शांत कुठे सावलीत आराम करत असतात, सर्वत्र शांतता पसरलेली असताना त्याला अजून गाढ करतो याचा आवाज. नर तांबटला हिंदीत बसंता, तर मादीला काय म्हणतात माहीत आहे का? ‘बसंती’ म्हणतात. रमेश सिप्पीचा ‘शोले’ कुणीही विसरू शकत नाही. हेमामालिनीने जी भूमिका केली ती बसंतीची. प्रत्येक सीन दुपारच्या वेळेचा असे. सतत बडबड करणारी बसंती हे नाव किती सार्थक ठरले! इथे कथा-पटकथा, लेखक आणि दिग्दर्शकाची कल्पनाशक्ती आणि निसर्गाविषयी ज्ञानाचा प्रत्यय येतो. कवी बिहारी यांनी या शब्दांत वर्णन केले आहे..
‘‘कहलाने एकत बसंत, अहि-मयुर, मृग्-बाघ,
जगत तपोवन सों कियो दीरघ दाघ निदाघ।’’
फळांच्या झाडांना भेट देणारा हा एकटा शिलेदार, मग इथे कसा काय पडला? जवळच्या बुचाच्या झाडावर माझे लक्ष गेले आणि झालेला प्रकार ध्यानात आला. शहरातील अनेक ‘पॉश’ बिल्डिंगप्रमाणे कोहिनूर आर्केडलाही काचेने सजवलेले आहे. या काचेत दिसणाऱ्या झाडाच्या व आकाशाच्या प्रतिबिंबामुळे भ्रमित झाला. समोरच्या प्रतिबिंबित झाडावर झेपावल्यावर काचेला धडकून खाली पडला असावा. त्याला उडून जाता यावे म्हणून मी त्याला बुचाच्या झाडावर सोडण्याचा प्रयत्न केला, पण ते काय जाईचना! कोण जाणे त्याला काय वेगळी शंका आली? त्याने पुन्हा विष्ठेची पिचकारी सोडली. माझ्या दुसऱ्या हातात काही महत्त्वाची कागदपत्रे होती, तरी परत प्रयत्न केला, पण तांबट महाशय माझं बोट काही सोडेचना!
तांबटला नेमकी जखम कुठे झाली हेही दिसत नव्हते. पायही व्यवस्थित वाटत होते. बरं या दरम्यान त्याने एकदाही पंख फडकवले नाही. कदाचित पंखातच इजा झाली असेल किंवा काचेवर जोरात आदळल्यामुळे पंखातलं एखादं हाड मोडलं असेल. पंखांना जोडणारं एक नाजूक हाड तुटल्यास उडणं अशक्य होतं.
तिथली काही माणसं तांबटला वाचवण्याची माझी ही धडपड बघत होते. जवळनंच त्या बिल्डिंगमध्ये जाणारं जोडपं माझ्याकडे वळालं. ती व्यक्ती माझ्या बोटावरची तांबटची पकड सोडवायचा प्रयत्न करायला लागली, पण तांबट काही सोडेना. तो माणूस अक्षरश: ओढायलाच लागला, तांबट पुन्हा थरथरायला लागला. मी तर चक्क त्याला ओरडलोच, ‘‘ओ, असे काय करता, मरेल ना तो..’’ या ओढाताणीने घाबरून तांबटने आपले डोळे बंद करून घेतले. त्या व्यक्तीने मग तांबटची एक-एक बोटं उलगडून तांबटला माझ्या बोटावरून स्वत:च्या हातावर घेतले. या तांबटला आता उपचाराची आवश्यकता होती. मला तर त्याचे उपचार कसे करावेत हे माहीतच नव्हते. काही दिवसांपूर्वी मोशी येथे दिसणारे पक्षी व प्राण्यांबद्दल वर्तमानपत्रात एक बातमी आली होती. यात पक्षिमित्र दीपक सावंत यांचा मोबाईल नंबरही दिला होता. तो मी माझ्या मोबाईलमध्ये नोंदवून ठेवला होता. लगेच त्यांना फोन लावला, पण अनेक वेळा प्रयत्न करूनही ते कव्हरेजच्या बाहेर असल्यामुळे फोन लागला नाही.
व्हॉइस मेसेज सोडा म्हणून सांगण्यात येत होते. मी तसा संदेश सोडला. त्या जोडप्यात
आपसात बोलणे सुरू झाले. ‘‘किती छान आहे’’ वगैरे. मी त्यांना त्या पक्ष्याचे नाव
तांबट आहे असे सांगितले. त्या बाई त्यांच्या मिस्टरांना म्हणाल्या, ‘‘आपण घरी घेऊन गेलो तर मुलं खूश होतील!’’
‘असे काही करू नका. हा पाळीव नाही, तसा मरून जाईन.’ मी त्यांना बजावलेच. मग ते नाही-नाही नेणार म्हणाले.
मी दुसरे मदत करू शकणारे म्हणजे ‘जिविधा’ या निसर्गविषयी काम करणाऱ्या संस्थेचे राजीव पंडित यांना मोबाईलवर संपर्क केला; परंतु तेही मोबाईल घरीच विसरून कुठे बाहेर गेल्यामुळे संपर्क झाला नाही.
त्या व्यक्तीने मला सोने-चांदीच्या बंद दुकानाबद्दल विचारले. मला त्या दुकानाची वेळ माहीत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘या पक्ष्याला कोणी घ्यायला आले तर मी आहे इथेच!’
मी म्हणालो, ‘आपल्या येथील बहिणाबाई प्राणी संग्रहालयात सोडले तर हा तांबट वाचेल.’ मला महत्त्वाच्या आणि तातडीच्या कामासाठी मागेच असलेल्या प्राधिकरण कार्यालयात जायचे होते.
‘मी सोडतो’, ते म्हणाले.
‘कसे सोडाल, गाडी आहे का?’ मी.
‘हो, मोटारसायकल आहे, मी सोडतो.’ ते.
पण माझ्या मनातून त्यांना त्या तांबटला घरी घेऊन जायची इच्छा असल्याची शंका जाईना. परत त्यात भर म्हणजे माझे महत्त्वाचे काम आणि त्या व्यक्तीने तांबटला हातावर घेतल्यापासून परत देण्याची तयारी अजिबात दाखवली नाही. हो, मात्र ‘मी सोडतो त्याला’ म्हणून वारंवार सांगितले.
ते जोडपं चाळिशी ओलांडलेलं सभ्य दिसत होते. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला; परंतु पुन्हा त्यांना बजावले, ‘याला घरी नेऊ नका, जगणार नाही. सरळ प्राणी संग्रहालयात द्या. कारण याला न्यायला पक्षिमित्राला संदेश पाठवला आहे. पण कधी त्यांना संदेश मिळेल आणि कधी ते येतील सांगता येत नाही’. मी मोबाईलने तांबटचा फोटो काढला, आठवण म्हणून. त्यांनी खात्री दिली. तरीही मी जड मनाने तिथून निघालो.
प्राधिकरणात माझे काम करायला गेलो असता राजीव पंडितांचा फोन आला. मी त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनी मला चिंचवडच्या बहिणाबाई प्राणी संग्रहालयाचे संचालक अनिल खैरे यांचा नंबर दिला. भविष्यात कधीतरी उपयोगी पडेल म्हणून मी नंबर नोंदवून घेतला. माझे कामही दुसऱ्या दिवसावर गेले आणि माझ्या ऑफिसला परत आलो. या घटनेला तसा बराच वेळ होऊन गेला होता. खात्री करण्यासाठी खैरेंना फोन केला व त्यांना तांबटविषयी सांगतिले; परंतु तिथे एकही जखमी तांबट आल्याचे कळले नाही. मग कुठे गेला तांबट? माझ्या मनातली शंका खरी ठरली की काय? त्या जोडप्याने आपल्या मनातलेच खरे करण्यासाठी मुलांना गंमत म्हणून चक्क घरी नेले का तांबटला? अशा अनेक प्रश्नांनी मला घेरलं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तांबट जगला की नाही? त्या तांबटला मी स्वत: एक दिवस माझे काम सोडून, प्राणी संग्रहालयात सोडला असता तर त्याचेवर खात्रीशीर उपचार होऊन तो वाचला असता! त्या गडबडीत मी त्या माणसाचा फोन नंबरही घेतला नाही. म्हणून कळायला मार्ग नव्हता. पक्षिमित्र दीपक सावंतला परत फोन लावायचा प्रयत्न केला, तेव्हाही ते रेंजच्या बाहेर असल्याचे कळले. व्हॉइस मेसेज पाठवताना ‘स्टार’ दाबायचंही मी विसरलो, म्हणजे संदेश पोहोचलाच नाही. आजही त्या बिल्डिंगच्या आवारात बुचाचं
झाड पाहिलं की, तांबटची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्या तांबटला वाचवण्याचे मी प्रयत्न करू शकलो नाही, त्याची मनात सल आहे. त्या जखमी तांबटचे काय झाले ते आजही कळले नाही. देव करो तो वाचला असावा.
यानंतर दोन-चार दिवसांनी याच बिल्डिंगच्या काचेत आपले प्रतिबिंब पाहून ‘चतुर’ समजला जाणारा एक कावळासुद्धा भ्रमित झालेला मला दिसला. तो काचेसमोर बसून आपल्या प्रतिबिंबावर चोचीने प्रतिस्पर्धी समजून प्रहार करत होता. तांबटचे नैसर्गिक शत्रू म्हणजे शिकारी पक्षी. पण अनैसर्गिक मृत्यू होतात ते मानवी हस्तक्षेपामुळे! एखाद्या आरशाला किंवा काचेला आजही कुठलेही पक्षी अजूनही समजू शकले नाही. मानववस्तीतच राहणारी चिमणीसुद्धा आरशाला आजही भ्रमित होते. या घटनेनंतर साधारण काही महिन्यांनी असे काचेमुळे अनेक पक्षी बळी जात असल्याची वृत्तपत्रात बातमी वाचनात आली. माणसांना स्वत:ची प्रगती, शोभावाढीसाठी पर्यावरणावर आणि जैवविविधतेवर होणारे वाईट परिणाम रोखण्याची बुद्धी येईल का? आजही काचेच्या प्रतिबिंबात अनेक पक्षी आदळून जखमी
होत आहेत. आपण या अनेक पक्ष्यांची निवासस्थाने म्हणजे झाडे तर अनेक कापलीच आहेत! अशी शोभा, सजावट काय
कामाची, जे सृष्टिसौंदर्याचे, निसर्गचक्राचे अभ्यंग असे निर्दोष पक्ष्यांना इजा पोहोचवत असेल! खरंच आपल्याला नैसर्गिक सौंदर्यापेक्षा कृत्रिम आणि जीवघेणी शोभा इतकी प्रिय आहे का?

उमेश वाघेला - (लोकसत्ता)
swastishreehobbies@gmail.com

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...