एक दिवस प्युमा, लिंक्‍स आणि सिल्व्हानसोबत!

सकाळ वृत्तसेवा: कॅनडातील मसकोका व्हॅलीमध्ये प्राणीमित्र डेल जीनॉऊ वन्यप्राणी सुटका आणि पुनर्वसन केंद्र चालवतात. "ई-सकाळ'चे वाचक डॉ. अमोल खेडगीकर यांनी नुकतीच या केंद्राला भेट दिली. कॅनडातील प्रख्यात छायाचित्रकार रे बार्लो हे देखील त्यांच्यासोबत होते. या केंद्रातील विविध प्राण्यांची काढलेली छायाचित्रे डॉ. खेडगीकर यांनी वाचकांसाठी शेअर केली आहेत.

पुनर्वसन केंद्रात गेल्यावर आम्हाला पहिल्यांदा दिसला तो लांडगा. भारतातील लांडग्यांपेक्षा इथं दिसणारे लांडगे वेगळे आहेत. आकाराने ते मोठे आणि धिप्पाड आहेत. आम्ही गेलो त्यावेळी तिथं प्रचंड हिमवृष्टी झाली होती. त्यामुळे चालणं मुश्‍किल होतं. कोणता प्राणी अंगावर आला, तर पळणं अजूनच अवघड. सोबत डेल होता म्हणून या प्राण्यांना जवळणं पाहणं आम्हाला शक्‍य झालं.


प्युमा हा वाघाच्या जातकुळीतला प्राणी. त्याच्या नजरेतूनच ते जाणवतं. सोबतच्या छायाचित्रात दिसतोय त्याचं नाव कोकनी. डेल लहान असल्यापासूनच कोकनी तिथं आहे. कॅनडाच्या पर्वतशिखरांमधील अत्यंत ताकदवान असा हा प्राणी. त्यामुळे त्याच्या जवळ जाण्याचं धाडसं सुरवातीला झालंच नाही. मग डेलच्या आधारानं मी त्याच्या पिंजऱ्यात गेलो. त्यांना माझ्याकडे धाव घेतली, मात्र, मी कोणतीच हालचाल न केल्याने तो माघारी फिरला आणि मला थोडसं हायसं वाटलं.


लिंक्‍स हा मांजरीसारखाच दिसणारा प्राणी. लिंक्‍सच्या पिंजऱ्यात जाण्याचा अनुभव खरोखरच अविस्मरणीय असाच म्हणावा लागेल. लिंक्‍सला मी एवढ्या जवळून कधीच पाहिलं नव्हतं. सोबतच्या छायाचित्रात दिसतेय ती येती. जवळपास २५ किलो इतकं तिचं वजन आहे.सिल्व्हान म्हणजे रानमांजर. ऊर्जा आणि उत्साहाचं मूर्तिमंत प्रतिक. एक ठिकाणी स्वस्थ बसेल, तरी ती सिल्व्हान कुठली. सारखं इकडून तिकडं आणि तिकडून इकडं करणं, हेच तिचं काम. सिल्व्हानबरोबर लपाछपी खेळण्याचा मी पुरेपूर आनंद लुटला. एवढं सगळं बघण्यात दिवस कसा निघून गेला ते आम्हाला कळलंच नाही. डेल चालवत असलेले पुनर्वसन केंद्र माझ्या घरापासून बरंच दूर आहे. पण तिथला प्रत्येक क्षण आता आयुष्यभर लक्षात राहील, हे नक्की.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...