आजारी घुबड आढळल्यास त्याचे संरक्षण करावे


 इतर घुबडांच्या तुलनेत विरळ पिसे असल्याने गव्हाणी घुबड कडाक्‍याची थंडी सहन करू शकत नाही. त्यामुळे या कालावधीत मानवी वस्तीत ऐन रस्त्यावर, गच्चीत तसेच मैदानांवर भर दिवसा आजारी अवस्थेत बसलेले घुबड अनेकांना पाहायला मिळते. निसर्गप्रेमींना असे घुबड आढळून आल्यास आवर्जून त्याचे संरक्षण करावे, असे आवाहन पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी केले आहे.

डॉ. पांडे म्हणाले, ""घराजवळ मोठे घुबड आले आहे, त्याला वाचवा,'' अशी माहिती देणारे फोन मला, तसेच अनेक पक्षी-अभ्यासकांना दर वर्षी थंडीच्या कालावधीत येतात. अनेकदा घुबड रस्ता, बाग अथवा गच्चीचा आसरा घेते. ते निशाचर असल्याने दिवसा कमी दिसते, पर्यायाने फारसे उडताही येत नाही. अर्थातच जवळपासचे कावळे त्रास देतात. त्यामुळे नागरिकांनी त्याला नक्कीच मदत केली पाहिजे. घुबडाच्या अंगावर टोपली अथवा खोके (श्‍वास घेण्यासाठी बिळे पाडून) ठेवले तर ते नक्कीच सुरक्षित राहील. मात्र त्याला काही खायला देऊ नये. रात्री टोपली उचलली की ते स्वतःहून उडून जाते. पक्षी मित्राच्या मदतीने त्याला उचलून आडोशालाही तुम्ही ठेवू शकता. काही दिवसांपूर्वीच मला काही विद्यार्थ्यांचा या संदर्भात फोन आला होता. योग्य वेळी मार्गदर्शन मिळाल्यामुळे घुबडाला वाचविण्यात यश आले आहे,'' असेही पांडे यांनी नमूद केले.

घुबड निसर्गातील महत्त्वाचा घटकघुबड दिसले की दिवस वाईट जातो, हा पक्षी अशुभ आहे, अशी आपल्याकडे अंधश्रद्धा आहे. पण प्रत्यक्षात घुबड हा निसर्गचक्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून, आपल्या परिसरातील उंदीर खाऊन ते एक प्रकारची मदतच करीत असतात. वर्षभरात प्रत्येक घुबड तब्बल साडे आठशे उंदीर खाते, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही सतीश पांडे यांनी नमूद केल.
 
 -पुणे सकाळ

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...