वाघ, सिंह, बिबट्या दत्तक देणे आहे...

सकाळ वृत्तसेवा
मुंबई - अनाथ आश्रमातून लहान मुले दत्तक घेतली जात असल्याचे तुमच्या कानावर कधी तरी आले असेल; परंतु वाघ, सिंह, बिबट्या हे खतरनाक वन्य प्राणीही दत्तक घेतले जाऊ शकतात; यावर तुमचा विश्‍वास बसेल? अहो, तशी योजनाच बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्क व्यवस्थापनाने आखली आहे. हे दत्तकविधान पार पडल्यानंतर ते प्राणी तुम्हाला घरी न्यायचे नाहीत, तर फक्त त्यांचा देखभालीचा खर्च उद्यान व्यवस्थापनाला द्यायचा आहे. या दत्तक योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे फक्त काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

मुंबईसारख्या सिमेंट कॉंक्रीटच्या शहरात बोरिवलीचे नॅशनल पार्क म्हणजे वाळवंटात "ओऍसिस' आहे. विस्ताराने हजारो चौरस फुटांचे क्षेत्रफळ, निसर्गरम्य घनदाट वनराई, दुर्मिळ वनस्पती आणि स्वर्गीय शांतता हे नॅशनल पार्कचे वैशिष्ट्य आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातूनही हजारो पर्यटक येथे भेट देतात. मुंबईकरांना राणीबागनंतर वन्यप्राण्यांचे दर्शन घडविणारे हे एकमेव उद्यान आहे. या उद्यानात सध्या 4 सिंह, 3 पांढरे पट्टेरी वाघ, 4 पिवळ्या पट्ट्यांचे वाघ, 22 बिबटे, 8 उदमांजरे, 4 चितळ, 2 निलगाय आणि 1 भेकर अशी वन्यसंपदा आहे. प्राण्यांच्या वर्गवारीनुसार कुणी शाकाहारी; तर कुणी मांसाहारी आहेत. या प्राण्यांचा दैनंदिन देखभालीचा खर्च प्रचंड असून राज्याच्या वन विभागामार्फत तो केला जातो. निसर्गाशी एकरूपता राखणाऱ्या या प्राण्यांसाठी दत्तक योजनेचा प्रस्ताव उद्यानातर्फे राज्याच्या वन खात्याकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती नॅशनल पार्क उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक सुरेश थोरात यांनी दिली. अशा प्रकारची दत्तक योजना बंगळूरमधील बनरगट्टा राष्ट्रीय उद्यानात राबविली जात आहे.

सध्या राज्याच्या निवडणूक आयुक्त असलेल्या नीला सत्यनारायण यापूर्वी वन विभागाच्या अतिरिक्त सचिव होत्या. त्यांनी आज नॅशनल पार्कमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या
प्रस्तावाची आठवण राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांना करून दिली. या विषयावर पतंगराव कदम यांनी कोणतेही मत व्यक्त केली नाही; मात्र या योजनेला चालना मिळेल, असा विश्‍वास सत्यनारायण यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.

अशी आहे दत्तक योजना (प्राण्यांचा प्रत्येकी खर्च)
सिंह - 2 लाख 55 हजार
पांढरा वाघ - 3 लाख 15 हजार
पिवळा वाघ - 3 लाख 5 हजार
बिबट्या -1 लाख 15 हजार
उदमांजरे - 35 हजार
चितळ - 20 हजार
निलगाय - 30 हजार
भेकर - 10 हजार

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...