फुलपाखरांचे सौंदर्यविश्व व्याख्यानातून उलगडले

सौजन्य : सकाळ वृत्तसेवा
पुणे - फुलपाखरांची जीवनशैली, त्यांची वैशिष्ट्ये, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी असलेले त्यांचे महत्त्व ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्याख्यानातून उलगडले.

"रोटरी क्‍लब ऑफ पुणे'तर्फे आयोजित "विज्ञान महोत्सवातील व्याख्यानमालेत डॉ. गाडगीळ यांचे "फुलपाखरांच्या सौंदर्याचे विश्‍व' या विषयावर नुकतेच व्याख्यान आयोजिण्यात आले होते.

गाडगीळ म्हणाले, ""गेली पंधरा कोटी वर्षं फुलं आणि फुलपाखरं हातात हात घालून बहरत चालली आहेत. फुलपाखरांचं आणि वनस्पतींचं नातं मित्र आणि शत्रूचंदेखील असतं. मानवजातीपेक्षा अनेक दृष्टीने फुलपाखरू समर्थ असतं. ते आपल्याला दिसू न शकणाऱ्या जांभळ्या रंगापलीकडचं पाहू शकतं. आपण एका सेकंदात वीस चित्रं पाहू शकतो, फुलपाखरं मात्र एका सेकंदात पन्नास चित्रं पाहू शकतात. पाठीमागून पाहण्याची अद्‌भुत शक्ती निसर्गाने फुलपाखरांना बहाल केली आहे.''

इतर कीटकांच्या तुलनेत फुलपाखरांचे प्रौढावस्थेतील आयुष्य अल्पकालीन असते. शिकारीचा प्रतिरोध व्हावा आणि जीव वाचावा, या उद्देशाने फुलपाखरांची रचना झालेली असते. त्यांची उडण्याची पद्धत, बसण्याची ढब, पंखाच्या खालच्या आणि वरच्या बाजूत फरक असतो. सर्वसाधारणपणे त्यांची वरची बाजू आकर्षक आणि खालची बाजू लक्षात न येणारी असते. सर्वात सुंदर दिसणाऱ्या जातीची फुलपाखरे बहुतांश वेळा विषारी असतात, असेही डॉ. गाडगीळ यांनी सांगितले.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...