क्षितिजाआडून अरुणोदय झाला की, गूढ अरण्य व शांत परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागा होतो. लिंबोणीच्या डहाळीवर बसून चोचीने लालचुटून फळे मटकावत, शेपटीचा तुरा हलवत पक्षी गाणी गातो.
युगानुयुगे पक्ष्यांनी अशी गाणी गात शिवाराला मंत्रमुग्ध करून टाकले आहे. या गोष्टीचे आश्चर्य वाटल्यामुळेच पक्षी नेमके संवाद कसे साधतात, याचा रहस्यभेद करण्याकरिता कॉर्नेल प्रयोगशाळेतील पक्षीशास्त्र विभागातील संशोधिका सॅन्ड्रा व्हेहरेनकॅम्प यांनी ग्युएनाकास्ट (कोस्टारिका) येथील सांता रोझा राष्ट्रीय उद्यानात अनेक पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड केले.
सॅन्ड्रा म्हणतात, ""मी अनेक गाणाऱ्या पक्ष्यांचे आवाज प्रथम रेकॉर्ड केले. त्यानंतर जो पक्षी गाणे गातो त्या पक्ष्याच्या मादीला तो आवाज पुन्हा ऐकविला. तेव्हा पक्ष्यांच्या संवादाचे स्वरूप समोर आले. नर व मादी पक्षी हे प्रामुख्याने पुनरुत्पादनासाठी प्रणय करण्याकरिता गातात, असा एक समज होता; पण यातून आपली सीमा ठरविणे, वयाचा अंदाज घेणे, प्रकृतिस्वास्थ्याची विचारपूस करणे आदी गोष्टी संवादाद्वारे पक्षी जाणून घेतात, हे लक्षात आले. पक्षी गाणे गाण्याकरिता कोणता घटक कारणीभूत ठरतो, याचा शोध घेणे सुरू आहे. कोस्टारिका, कोलंबिया, बोनेर येथे पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासांचा अभ्यास करण्याकरिता मी कॉर्नेल प्रयोगशाळेच्या जैविकध्वनिशास्त्र संशोधन प्रकल्पात सहभागी झाले आहे. मी व माझ्या सहकाऱ्यांनी पक्ष्यांचे आवाज गोळा केले. जेव्हा आम्ही रेकॉर्डेड आवाज नर व माद्यांना ऐकविले, तेव्हा ते मीलनोत्सुक व आपली सीमा ठरविण्यासाठी सक्रिय झाल्याचे आढळले.''
सॅन्ड्रा म्हणतात, ""आपली सीमा ठरविताना पक्षी एकमेकांशी कधीच भांडत नाहीत. अशा वेळी ती अन्य पक्ष्यांशी तडजोड करण्याकरिता सुंदररीतीने गातात. जेव्हा ते भांडतात, त्यावेळी ते किंमत चुकवितात. एखाद्या प्लेबॅक सिंगरप्रमाणे त्यांचे गाण्याचे कार्य असते. मादीपेक्षा नर पक्षी हा वेगवेगळे आवाज काढण्यात माहिर असतो. सीमावाद उद्भवला की, तो अशा आवाजांचा उपयोग करतो.''
अशा तऱ्हेने गाणी गात सीमावाद संपविणे, एकमेकांशी दोस्ती वाढविणे, आपली प्रजाती निसर्गात टिकवून ठेवण्याकरिता मादीशी मीलन करणे, घरटी बांधणे, अंडी उबविणे, पिल्लांची काळजी घेणे सुरू असते। परिसरातील किलबिलाटात इतके मोठे कार्य सुरू असते. आश्यर्च वाटते ना, हे वाचून. वृक्षाच्या डहाळीवर बसून जेव्हा एखादा पक्षी गातो, तेव्हा कान तृप्त होतात. अशा वेळी ते काय म्हणतात, हे पाहणे ही मनोरंजक ठरते. पूर्वी वैदिक ऋषींच्या आश्रमात शिष्यांना पहिल्यांदा पक्ष्यांची भाषा शिकविण्यासाठी अरण्यक् करावे लागायचे. पक्षी आपल्या परिसराबद्दल दररोज भाष्य करीत असतात, थोडे लक्ष द्या.
सौजन्य: दै.सकाळ
पक्षी गाणे गातो तेव्हाची गोष्ट!
Posted by Pravin at 9:06 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 Comments:
Post a Comment