येरवडा, ता. १४ - केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या अख्त्यारित असलेल्या भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागातील एका तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्याने गेल्या ३६ वर्षांच्या ध्यासातून माळरानावर हिरवाई फुलविली आहे.
मुंढव्याजवळ मुळा-मुठा नदीकाठावरील ४३ एकरांत के. बी. बारणे यांनी आपल्या ३६ वर्षांच्या अथक परिश्रमातून एक प्रायोगिक वनस्पती उद्यान' फुलविले आहे. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या सेवेच्या ध्यासातून उभे केलेले हे उद्यान इतरांसाठी आदर्श ठरले आहे.
याबाबत बारणे म्हणाले, ""ओसाड माळरान असलेल्या ४३ एकर परिसरात १९७४ ला एका रोपाने (रेनट्री) या उद्यानाची सुरवात झाली. सैन्य दलातील जवानांनी "बुलडोझर' चालविण्याचे प्रात्यक्षिक या माळरानावर केल्याने जमीन समतल झाली होती. पाण्यासाठी एक विंधन विहीर घेऊन चार-पाच कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने उद्यानफुलविण्याच्या कामाला सुरवात केली. राज्यासह देशभरातील दुर्मिळ आणि लुप्त होणाऱ्या वनस्पतींचे संवर्धनकरण्याच्या उद्देशाने या प्रायोगिक स्वरूपाच्या उद्यानाची निर्मिती झाली आहे. वेळोवेळी विभागातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनही यासाठी घेतले.''
उद्यानात औषधी वनस्पतींपासून ते विविध प्रकारचे वृक्ष बहरलेले आहेत. याला अपवाद फक्त फळ झाडांचा. उद्यानात रानतुळस, सब्जा, गुरुडशेंग, लाजाळू, पांढरी आणि जांभळी सदाफुली, पांढरा व लाल गुंज, ब्रह्मी, अनंतमूळ, चंद्रमुळी, नागीण, अश्वगंधा, अडुळसा, गवतीचहा, वाळा, आंबेहळद, एरंड, सर्पगंध, तीन प्रकारचे पाणफुटी, पिंपळी, रुई, कॉफी, मधुमालती, रोहितकपासून ते उत्तर प्रदेश व सह्याद्रीच्या रांगेतील पांढरा धोत्रा, फेरियाइंडिका, रानतूर, पेंडगुळ, रानउडीद, रानघेवडा, शिसे, बिबला, पांगारा, पळस अशा अनेक लहानमोठ्या वृक्षांसह दुर्मिळ वनस्पतींचे जतन केले गेले आहे. तसेच हिमाचल प्रदेशमधील "टॅक्सोडियम' नावाच्या दुर्मिळ वृक्षाचे रोपण२५ वर्षांपूर्वी केले आहे. उपग्रहाच्या माध्यमातून पुण्याचे छायाचित्र घेतल्यानंतर सर्वात दाट हिरवळीचा पट्टा कायआहे, असा अनेकांना प्रश्न पडला होता. तो भाग म्हणजेच हे वनस्पती उद्यान असल्याचे बारणे अभिमानाने सांगतात.
------------------------------
नागरिकांची वृक्षतोड
उद्यानात विविध पक्ष्यांसह साप, मोर, लांडगे, मुंगूस आदींचे वास्तव्य आहे. एका तळ्याच्या भोवती वृक्षांनी नटलेला परिसर आहे. या वृक्षांवर गेली कित्येक वर्षे शेकडो लव्हबर्ड घरटी बांधत असत. मात्र शेजारच्या वस्तीतील नागरिक बेकायदेशीर वृक्षतोड करीत असल्यामुळे ते आता दिसत नाहीत. अपुरा कर्मचारीवर्ग, पाण्याची कमतरातया सतत भेडसावणाऱ्या समस्यांबाबत के. बी. बारणे यांनी खंत व्यक्त केली. पुढील वर्षी बारणे सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर या उद्यानाचे काय?
संदर्भ: दै.सकाळ "
अथक परिश्रमातून फुलले उद्यान
Posted by Pravin at 7:30 AM
Labels: medicinal plants in maharashtra, rain tree
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 Comments:
Post a Comment