उजनीवर उतरले "परदेशी पाहुणे'

प्रा. प्रशांत चवरे - सकाळ वृत्तसेवा(१९ डिसेंबर ०८)
भिगवण - उजनी जलाशयाच्या पाण्याच्या फुगवट्यावर परदेशी स्थलांतरित रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले आहे.
पक्षिमित्रांचे आकर्षण असलेल्या असलेल्या रोहित पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी या परिसरामध्ये होत आहे.

उजनी धरणामध्ये पाणी साठविण्यास सुरवात झाल्यापासून हा परिसर पक्ष्यांसाठी पूरक ठरला आहे. वर्षभर या परिसरामध्ये पक्ष्यांची संख्याही लक्षणीय असते, परंतु पक्षिमित्रांचे व पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या रोहित पक्ष्यांच्या आगमनाची सर्वांनाच प्रतीक्षा असते. चालू वर्षी रोहित पक्ष्यांचे वेळेत आगमन झाले आहे व पक्ष्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. रोहित पक्ष्यांबरोबरच राखी बगळे, पाणकोंबड्या, बदक, सर्पमित्र, दर्विमुख आदींसारख्या सुमारे पन्नास जातींच्या पक्ष्यांची गर्दी सध्या जलाशयावर पाहायला मिळते. त्यामुळे जलाशयावर सकाळी व सायंकाळी पक्ष्यांची शाळाच भरल्यासारखे वाटते.

थंडी सुरू झाली की हिवाळी पर्यटनासाठी पर्यटक बाहेर पडतात. त्यासाठी भिगवण व परिसर पर्वणीच ठरत आहे. लांबच लांब पसरलेले पाणी, नौकानयन व त्यामध्येच दुर्मिळ, सुंदर, परदेशी रोहित पक्ष्यांचे दर्शन, हा अनोखा संगम भिगवण व परिसरामध्ये आलेल्या पर्यटकांना अनुभवायला मिळतो. उजनी जलाशयामध्ये पाणी साठविण्यास सुरवात केल्यापासून गेल्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये या परिसरामध्ये पक्ष्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये केवळ काही निवडक ठिकाणीच येणाऱ्या रोहित पक्ष्यांचे हा परिसर आवडते ठिकाण बनल्यामुळे या परिसरामध्ये महाराष्ट्रासह देशातील पक्षिप्रेमी पर्यटक गर्दी करीत आहेत.

बगळ्यासारखी उंची, अग्निपंख, लांब पाय, उंच मान व त्याचा रुबाबदारपणा यामुळे रोहित पक्षी आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. पंधरा ते वीस वर्षांहून अधिक काळ नियमितपणे डिसेंबर ते एप्रिल या चार ते पाच महिन्यांमध्ये रोहित पक्ष्यांचे वास्तव्य उजनीच्या पाण्याच्या फुगवट्यावर असते. परिसरामध्ये असलेली नीरव शांतता, रहदारीपासून दूर, खाण्यासाठी मुबलक मासे, असे पूरक वातावरण या परिसरामध्ये असल्याने पूर्वी थोड्या संख्येने येणाऱ्या रोहित पक्ष्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील भीमानगर ते दौंड तालुक्‍यातील खानोटा अशा सत्तर किलोमीटरच्या पट्ट्यात भिगवण, डिकसळ, कुंभारगाव, पळसदेव, डाळज (ता. इंदापूर), खानोटा, राजेगाव (ता. दौंड), कात्रज, टाकळी (ता. करमाळा) आदी गावांच्या परिसरामध्ये या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. परंतु भिगवणजवळील डिकसळच्या इंग्रजकालीन पुलाच्या परिसरामध्ये या पक्ष्यांचे थवेच्या थवे पाहायला मिळतात.

उत्तर मध्य आशिया, पूर्व युरोप, सैबेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका अशा देशांचा दौरा करत रोहित पक्ष्यांचे डिसेंबरच्या मध्यात उजनी जलाशयावर आगमन होते. डिसेंबर ते एप्रिल या पाच महिन्यांमध्ये या परिसरामध्ये वास्तव्य करून हे पक्षी पुन्हा परतीच्या प्रवासास निघतात. मागील काही वर्षांमध्ये या परिसरातील पूरक वातावरणामुळे अनेक रोहित पक्ष्यांचे तुरळक प्रमाणात बारमाही वास्तव्यही आढळून आले. येत्या काही दिवसांमध्ये या प्रमाणात वाढ झाल्यास पक्षिमित्रांसाठी व पर्यटकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
रोहित पक्षी पाहायला कसे जाल?
उजनीच्या पाण्याच्या फुगवट्यावर असलेले रोहित पक्षी पाहायला जाण्यासाठी पुणे बस स्थानकावरून एसटीची व्यवस्था आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण बस थांब्याला उतरून भिगवणपासून पंधरा किलोमीटरवर डिकसळ पूल आहे. पुणे रेल्वे स्थानकांवरून रेल्वेचीही सुविधा उपलब्ध आहे. डिकसळ पुलाजवळ मच्छीमारांच्या बोटीची व्यवस्था पर्यटकांसाठी होऊ शकते.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...