युगुलनृत्य

Photo:Baiju Patil
उडणार्‍या पक्ष्यांमध्ये सारस पक्षी हा बहुधा सर्वात मोठा पक्षी ठरावा. सारस पक्षी आता संख्येने खूप कमी उरले आहेत. भरतपूर (राजस्थान) येथील पक्षीअभयारण्य आणि पश्‍चिमी नेपाळच्या जंगलातून हा पक्षी आढळतो. त्याचे शास्त्रीय नाव ¬१४२ अल्ल३्रॅल्ली असे आहे. उडणार्‍या सारस पक्ष्याची पसरलेल्या पंखासह लांबी तब्बल पाच ते सहा फूट भरते. पक्षीसृष्टीमध्ये नर आकाराने मोठा व अधिक डौलदार असतो. मादी आकाराने थोडीशी लहान असते. ती पावसाळ्यात अंडी घालते. अंड्यांतून पिलू जेव्हा बाहेर पडते तेव्हा त्याच्या अवतीभोवती (पावसाळ्यामुळे) त्याच्या खाण्यासाठी भरपूर किडेमकोडे उपलब्ध होतात. निसर्गानंच तशी तरतूद केलेली आहे.
सारस पक्ष्याचे फोटो काढण्यासाठी म्हणूनच पावसाळा हा ऋतू चांगला. अंडी घालण्यासाठी नर-मादी मिळून एक मोठ्ठं घरटं तयार करतात. हे घरटं म्हणजे पाण्यामध्येच काटक्या, पानं-पाला, वेली, गवत यांचा वापर करून तयार केलेला साधारण पाच फूट व्यासाचा भरेल असा एक तरंगता प्लॅटफॉर्मच असतो. त्यावर मादी अंडी घालते. अंडी उबविण्याचे काम नर आणि मादी दोघे मिळून आळीपाळीनं करीत असतात. त्या काळात आपल्या या ‘घरट्या’कडे येणार्‍या कोणीही पशुपक्षी, माणूस यांच्यावर हल्ला करून ते त्यांना दूर पळवून लावतात. त्यामुळेच त्या काळात त्यांचा फोटो काढणं जोखमीचंही असतं.
मी भरतपूरच्या (राजस्थान) पक्षीअभयारण्यात सारस पक्ष्यांची जोडी लोकेट केली आणि आठ दिवस त्यांच्या ‘घरट्या’पासून साधारण तीस मीटर अंतरावरच्या दाट झुडपात माझा कॅमेरा रोखून बसलेलो होतो. सारस पक्ष्यांच्या त्या जोडीला माझ्या अस्तित्वाचा पत्ताही लागू न देता त्यांचे फोटो काढत होतो.
साधारण दर दोन तासांनी अंड्यांवर बसण्याची ‘ड्यूटी’ नर-मादी आलटून-पालटून करतात. दोन तासांचा इंटरव्हल, हे वेळेचं भान त्यांना आपसूकच होत असावं. तेवढा वेळ दुसरा जोडीदार त्या ‘घरट्या’वर लक्ष ठेवत आसपासच किडे, अळ्या पकडत असतो. कुठल्याही परिस्थितीत ते घरट्याला, त्यातील अंड्यांना आपल्या नजरेआड होऊ देत नाहीत.
दोन तास अंड्यांवर बसणे झाले की सारस पक्षी विशिष्ट आवाजात साद घालून आपल्या जोडीदाराला बोलावतो. जोडीदारही तत्परतेनं येतो. मग ही जोडी काही क्षण छोटेसे नृत्य करते. त्याअंतर्गत हवेतही हळुवार उड्या मारते. एकमेकांच्या गळ्यात गळा घालते. केवळ काही क्षणच चालणार्‍या सारस पक्ष्यांच्या जोडीच्या या नृत्यसदृश हालचाली विलक्षण डौलदार, सफाईदार, हळुवार आणि नेत्राकर्षक असतात. म्हणूनच पक्षीसृष्टीत सर्वात सुंदर नृत्य (ऊ्र२स्र’ं८) हे सारसच्या जोडीचे मानले जाते. ते क्षण मी मोठय़ा चिवटपणे, शांतपणे माझ्या कॅमेर्‍यात पकडले. साधारण सात-आठ दिवस मी त्यासाठी सारस जोडीच्या मागावर होतो.
उत्तम प्रकाश, सुंदर नेत्राकर्षक हालचाली, मोकळं लोकेशन हे पक्ष्यांच्या सुरेख फोटोंसाठी खूप आवश्यक असतं. याच सारस पक्ष्याचा पूर्ण पंख पसरून उड्डाण करणाराही फोटो मी काढलाय. बक्षीस त्यालाच मिळालंय. पक्षी छायाचित्रणाचे रंगीत मासिक ‘सँक्च्युरी एशिया’च्या फेब्रुवारी २00९ च्या अंकात सारस पक्ष्याच्या माझ्या छायाचित्रांबद्दल भरपूर कौतुक छापून आले.
सारस पक्षी खूप दुर्मिळ होत चाललेले आहेत. अगदी भरतपूरच्या अभयारण्यातही त्यांच्या मोजक्याच जोड्या आता उरल्या आहेत. भरतपूरला मी गेली अनेक वर्षं छायाचित्रणासाठी जातो. दर भेटीत या अभयारण्यातील पक्षीवैभव कमी कमी होत चालले आहे, हे मला जाणवते. पर्जन्यमान कमी झालेय हे त्याचे एक नैसर्गिक कारण आहे. परंतु अनेक कारणे मनुष्यनिर्मित आहेत. ती कारणे, त्या अडचणी दूर व्हाव्यात असेच कोणाही निसर्गप्रेमी माणसाला वाटेल.
भारताला पशुपक्षी वैविध्याचा खूप मोठा खजिना लाभलेला आहे. त्याचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे.सौजन्य:बैजू पाटील ,शब्दांकन : सुधीर सेवेकर
manthan@lokmat.com

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...