स्वर्ग धरेला चुंबायाला, खाली लवला...!

माधव गाडगीळ,सकाळ

आपला शेजारी भूतान एका वेगळ्याच उद्दिष्टाने प्रेरित होऊन आधुनिकतेकडे वाटचाल करतो आहे. त्यांचे ध्येय आहे देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत ग्रॉस नॅशनल प्रॉडक्‍टच्या जागी ग्रॉस नॅशनल हॅपिनेसचा मागोवा घेणे.

दो न्ही बाजूंना उत्तुंग हिमाच्छादित शिखरे, कड्यांच्या घसरगुंडीवर हिमनद्या, खालच्या खोल दरीत खळखळणाऱ्या सरिता; डोळ्यांचे पारणे फिटेल असे हे दृश्‍य बघता-बघता विमानाने एका निरुंद खिंडीत झेप घेतली. क्षणभर वाटले, डोंगरावर आदळणार! पण नाही, अगदी अलगद भूतानच्या विमानतळावर उतरलो. आसमंतातल्या निसर्गाइतकीच आकर्षक होती विमानतळाची वास्तू. नखशिखान्त एका सुबक नक्षीने सजवलेली. प्रवेशद्वाराशी मोठा फलक होता- "सुस्वागतम्‌, आमचे ध्येय आहे या राष्ट्राला आनंदाचे उधाण आणण्याचे! इतर देश खुशाल ग्रॉस नॅशनल प्रॉडक्‍टच्या मागे लागोत, आम्हाला हवाय ग्रॉस नॅशनल हॅपिनेस!'  

भूतानवासीय म्हणतात आर्थिक वाढीपेक्षा आम्हाला हवा अधिक आनंद.
तिबेटला चिकटून, सिक्कीम-अरुणाचलच्या बेचक्‍यात पहुडलेला डोंगराळ भूतान एक अफलातून देश आहे. इथल्या राजाने वीस वर्षांपूर्वी घोषणा केली- आपण आधुनिकतेकडे वाटचाल करत मानवाला आणि जोडीने निसर्गाला उपकारक, आनंद फैलावणारी अशी आदर्श समाजरचना, शासनप्रणाली, अर्थव्यवस्था उभारून जगाला दाखवू या. या आनंदयात्रेचे चार आधारस्तंभ असतील. पहिला- मनापासून आपल्या सुंदर पर्यावरणाचे संरक्षण, दुसरा- स्वच्छ, कार्यक्षम प्रशासन, तिसरा- एकमेकांना प्रफुल्लित करत स्वतः आनंदाचा आस्वाद घ्यावा ही बुद्धाची शिकवण आणि चौथा- सामाजिक ऋणानुबंध सांभाळणारी आपली संस्कृती. हळूहळू सध्याची कालबाह्य राजेशाही खालसा करू या आणि सर्वांना न्याय देणारी लोकशाही प्रस्थापित करू या. मग दोन वर्षांपूर्वी कोणीही ढकलत नसताना राजाने आपल्या हातातली सारी सत्ता, खुल्या निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या हातात सोपवली. स्वतःचा राजमुकुट उतरवून युवराजाच्या डोक्‍यावर ठेवला. भूतानच्या नव्या संविधानाप्रमाणे लोकप्रतिनिधी राज्य चालवतातच; शिवाय जरूर पडल्यास सार्वमताने निर्णय घेण्याची तरतूद आहे.

पर्यावरणाचे संरक्षण हा या सरकारच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आता जग तापू लागल्यावर भूतानच्या हिमनद्या विरघळू लागल्या आहेत; त्याची मोठी काळजी आहे. या संदर्भात त्यांनी आंतरराष्ट्रीय चर्चा आयोजित केली होती. चर्चेत भूतानचे पर्यावरणमंत्री, एक लोकसभा सदस्य, अनेक अधिकारी, शास्त्रज्ञ भाग घेत होते. या निमित्ताने मला त्यांच्याबरोबर खुल्या दिलाने बोलायला, खूप शिकायला मिळाले. भूतानातही खाणी आहेत आणि सोबत लोभी मंडळीही. अशातले काही होते राणीच्या नात्यातले. त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करून नासाडी सुरू केली होती. राजाला हे समजताच त्याने कडक कारवाई केली. आता भूतानात जे काय खाणकाम होते, ते अतिशय काळजीपूर्वक केले जाते.

वनसंपत्तीने समृद्ध भूतानचा पंचमांश भूभाग देवरायांनी झाकलेला आहे. यात बौद्ध विहारांजवळची विशाल तपोवने आहेत; शिवाय आहेत गावागावांतल्या मातृदेवतांची पवित्र वने. सर्व भारतखंडभर हा निसर्गरक्षणाच्या परंपरांचा ठेवा आहे. पण फक्त भूतानात त्यांचा मनापासून आदर केला जातो. मला भूतानातले सेरो, गोरल, भरलसारखे रानबोकड पाहण्याची फार उत्कंठा होती. आमचे यजमान म्हणाले, ""अवश्‍य, उद्या जाऊ या, टॅन्गो बौद्ध विहाराला. तिथल्या तपोवनात सहज पाहायला मिळतील गोरल, भेकर, काळी अस्वले, ब्लड फेजन्टसारखे रानकोंबडे.'' उत्साहात सकाळी निघालो. दोन्ही बाजूला डोंगर, झाडी. जिकडूनतिकडून "शैलस्तनातुनि लोटता गंगारूपी दुग्धामृत' अशा नितळ, खळखळणाऱ्या, फेसाळलेल्या पाण्याने भरलेले ओढे आणि दरीत झुळझुळणारी नदी. अखेर टॅन्गो डोंगराच्या पायथ्याला पोचलो. उभाच्या उभा, सिंहगडाच्या उंचीचा कडा आणि वर कड्याला भिडलेला बौद्ध मठाचा भला मोठा दगडी वाडा. सबंध डोंगरभर ओक, पाइनचे मिश्र अरण्य. त्यात मधूनमधून डोकावणारे ऱ्होडेडेन्ड्रॉन. पक्ष्यांची अखंड किलबिल. पावले नागमोडी पायवाट वरवर चढत गेली आणि अचानक रानातून बाहेर येऊन एका कड्याशी थबकली. खालच्या धारेवर खडे होते- मी ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो- ते दोन ठेंगणेठुसके रानबोकड- गोरल! अगदी बिनधास्त! मानवी विकासाची अनेक अंगे आहेत. निसर्गदत्त, तसेच मानवनिर्मित भौतिक संसाधनांची वाढ-घट, आरोग्य, शिक्षण, अर्थार्जन आणि आत्मसन्मान. पण बहुतेक सारी विकासाची चर्चा अतिशय संकुचित, एकांगी दृष्टिकोनातून केली जाते. जणू काही मानवनिर्मित संसाधने सतत फुगवत राहणे हाच विकास; बाकी सगळा बकवास! भूतान आपल्याला शिकवतोय, या पलीकडेही खूप काही आहे अन्‌ म्हणूनच आनंदाचे भरते येत, रानबोकडांना न्याहाळत मी केशवसुतांबरोबर गुणगुणायला लागलो : "स्वर्ग धरेला चुंबायाला, खाली लवला मजसी गमला। अशा वितरती अत्यानंदा, गिरि हे, वन हे, खग हे, मृग हे!' 


(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत)

1 Comment:

Mr.Guest said...
This comment has been removed by the author.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...