वेडीबाभूळ, टनटनी आणि ऊस.

सौजन्य : डॉ. महेश गायकवाड, दै. लोकसत्ता
वेडीबाभूळ, टनटनी आणि ऊस या तीन वनस्पतींमध्ये काही साम्य दिसणार नाही. तरीही त्यांच्यात साम्य आहे. ते म्हणजे या वनस्पतींनी राज्याचा बराचसा प्रदेश व्यापला आहे, तोसुद्धा मोठय़ा प्रमाणात! त्यांचे काही फायदे निश्चितच आहेत. पण त्याच्यामुळे स्थानिक अधिवासात बदल होत आहेत आणि प्राणी-पक्ष्यांची विविधतासुद्धा नष्ट होत आहे. त्यामुळे त्यांच्या बेसुमार वाढीकडे दुर्लक्ष झाल्यास त्याची फळे आपल्याला निश्चितपणे भोगावी लागणार आहेत..
साधारणपणे पृथ्वीच्या नियमानुसार ‘बदल’ हा अविभाज्य भाग आहे. या बदलांना सामोरे जाण्याची तयारी सर्वानाच करावी लागते. अर्थात वसतिस्थानामधील बदल हा तर पृथ्वीचा नियमच आहे. परंतु गेल्या काही शतकांमध्ये, विशेषत: दशकांमध्ये झालेले बदल चकित करणारे आहेत. अलीकडे मी बारामती परिसरात झालेल्या बदलांचा पक्ष्यांवर काय परिणाम होत असेल याचा अभ्यास करीत आहे. त्यामध्ये अनेक निष्कर्ष निघालेले आहेत. हा प्रदेश मूळचा गवताळ, काटेरी झुडपांचा आहे. यासारखा कमी पावसाचा व गवताळ प्रदेश राज्यात मोठय़ा प्रमाणावर आहे. हा प्रदेश अनियमित पावसामुळे शेतीमध्ये प्रगती करू शकला नाही. पण कालवे, धरणे, तळ्यांमुळे या क्षेत्रात प्रचंड बदल झालेले आढळतात. आता या भागात वेडीबाभूळ मोठय़ा प्रमाणावर फोफावली आहे, तशीच ती बऱ्याचशा कोरडय़ा भागात ठाण मांडून बसली आहे. ती ऑस्ट्रेलियामधून भारतामध्ये १८ व्या शतकाच्या शेवटी आली. सुरुवातीला बंगालमध्ये लागवडीसाठी आणण्यात आली. परंतु, तेथून तिचा प्रसार संपूर्ण देशभर खूपच झपाटय़ाने झाला. हा परदेशी वृक्ष असूनही त्याचा उपयोग मात्र मोठय़ा प्रमाणात ग्रामीण भागात होत आहे. मुख्यत: जळणासाठी लाकूड, जनावरांसाठी शेंगा व पाला उपयोगात आणला जातो. जर वेडीबाभूळ नसती तर आज आपल्या भागात आंबा, वड, पिंपळ, लिंब, खैर, बुरज इ. झाडे कदाचित पाहायलाही मिळाली नसती. हे सुबाभळीचे खरेतर खूप मोठे योगदानच म्हणावे लागेल. तसेच या झाडांमुळे मधमाशांना पराग व मकरंद मोठय़ा प्रमाणात मिळाल्यामुळे परिसरात अस्र््र२ उ’१ीं जातीच्या मधमाश्यांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे, हे एक वरदानच! फक्त याचा बेसुमार प्रसार म्हणजे प्रत्येक ठिकाणी हीच झाडांची संख्या जास्त झाल्यास त्याचा फटका पक्षी विश्वावर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण, पूर्वी खूप मोठय़ा प्रमाणात परिसरात गवताळ भाग होते, त्यावर वेडीबाभूळ लावल्यामुळे त्या परिसरातील धाविकसारखा पक्षी, हरिणासारखे प्राणी वेडय़ाबाभळीच्या झाडीमध्ये कधीही आढळत नाहीत.
वेडय़ाबाभळीसारखाच परदेशातून आलेला आणखी एक वृक्ष म्हणजे घाणेरी किंवा टनटनी! अगदी १९०० च्या शतकाच्या सुरुवातीला येऊन, घाणेरीचा प्रसार मोठय़ा प्रमाणात भारतभर झाल्याचे आढळते. घाणेरीदेखील जळण, शेळीला चारा अशी उपयोगी आहे. पण कीटक, कीडा व पक्ष्यांच्या काही जातींना मात्र तिचा खूप मोठय़ा प्रमाणात उपद्रव होत आहे. मधमाशांमध्ये ही काहीच उपयोगात येत नाही. बुलबुल, मैना, सातभाई यांना पण मोठय़ा प्रमाणात यांच्या फळाचा खाण्यासाठी उपयोग होतो. मात्र, याची बेसुमार वाढ ही भविष्यामध्ये अडचणीची होणार यात शंकाच नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘ऊस’ पीक. त्याचा विस्तारही प्रचंड वाढला आहे. बारामती तालुक्याचे उदाहरण द्यायचे तर, तिथे १८ व्या शतकामध्ये ऊस केवळ ३६० एकरावर होता. आता या भागातील पिकांपैकी ९० टक्के पेक्षा जास्त क्षेत्र उसाच्या लागवडीखाली आहे. शिवाय याची वाढती शेती हा प्रकार तर धक्कादायकच आहे. या ऊस क्षेत्रामुळे मानवाला साखर खायला मिळतेय, पण तोटय़ाची बेरीज केली तर माणसाच्या शरीरातील साखरच कमी झाल्याशिवाय राहणार नाही. वाढते ऊसक्षेत्रही धोक्याची घंटाच आहे. उसामुळे परिसरातील कीटकांची विविधता कमी होत आहे. तसेच पक्षीविश्वही कमी होत आहे. फक्त उसाच्या पानावर असलेले छोटेछोटे किडे खाण्यासाठी वटवटे, कस्तुर, शिंपी असेच पक्षी पाहावयास मिळतात. काही प्रमाणात तितर, भुरळी हे पक्षीदेखील ऊसक्षेत्रात पाहावयास मिळतात. गारवा व आडोशामुळे काही साप तसेच, बिबटय़ांची संख्या वाढत असल्याचे पुरावेदेखील समोर येत आहेत. पण मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या पक्ष्यांच्या जाती या भागात दिसतच नाहीत. जैवविविधता कमी होण्याचे प्रमाण या पिकांमुळे जास्त प्रमाणात दिसून येते.
उसाच्या कायमस्वरुपी लागवडीमुळे जमिनीचा पोतही खराब होत आहे, तसेच त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवरही होतच आहे. ऊस, वेडीबाभूळ, घाणेरी या तिन्ही वनस्पतींचा उपयोग मोठय़ा प्रमाणामध्ये आहे. पण त्याचे वाढते प्रमाण ही मात्र धोक्याची घंटा आहे. त्याचा इतर वन्यजीवांना फटका बसल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित! कारण ज्या ठिकाणी अनेक पिकांखालील क्षेत्रात वाढ होते व झाडांची लागवड केली जाते अशा परिसरामध्ये विशिष्ट प्रकारचे वन्यजीव आणि विशिष्ट पक्षीच अधिक प्रमाणात आढळत आहेत. मात्र, त्यांची विविधता कमी होत आहे. खरेतर आपण सर्वाना घेऊन जीवन जगलो तरच या पृथ्वीवर जास्त काळ घालवू शकतो. विविधता हाच खरा नियम आपण पाळला पाहिजे. आधीच्या पिढीतील व्यक्तींचे आयुष्यमान अधिक होते. ते सशक्त व निरोगी असत. मात्र, आता आयुष्यमान व स्वास्थ्य कमी होत आहे, कारण आपणच एकाकी जीवनाकडे चालतो आहोत. आपल्याला आपल्या घरात कोळी, पाली, मुंग्या नको असतात, पण खरंतर तेही आपलीच सेवा करीत असतात. कोळी तर डास व इतर कीटकांना खाऊन आपलेच संरक्षण करीत असतो. अगदी कुत्रा चोरांपासून संरक्षण करतो, शिवाय निसर्गतील भूकंपाची सूचनादेखील गावातील कुत्री एकत्रित ओरडून सांगतात, मांजर तर साऱ्यांपासून संरक्षण करतेच.
शेतातदेखील उसाशिवाय इतर ज्वारी, बाजरी, गहू, मूग, हरभरा वा इतर पिके असतील तर त्या परिसरामध्ये मोर, भारद्वाज, चतुर, धाविक, भुरळी, व्होला, धनेश असे अनेक पक्षी व इतर वन्यप्राणीही पहावयास मिळतात. हे पक्षी पिकांचे संरक्षण खूप मोठय़ा प्रमाणात करतात. त्यामध्ये गव्हाचे किडीपासून संरक्षण करताना मी अनेक भिंगऱ्या व पाकोळ्या (स्विफ्ट अ‍ॅन्ड स्वालोज) पाहिल्या आहेत. गव्हाच्या पिकाचे संरक्षण खूप मोठय़ा प्रमाणात करतात. कीटकापासून, उंदरांपासून संरक्षण करण्याचे तसेच परागीभवन करण्याचे महत्त्वाचे काम पक्षी करीत असतात. तात्पर्य हेच की, बाहेरून येणाऱ्या वनस्पतींचा आपल्याला काही प्रमाणात फायदा असला तरी त्यांची संख्या अनियंत्रित झाली तर मात्र बदलत्या अधिवासाचा पक्ष्यांवर व वन्यजीवांच्या विविधतेवर परिणाम होईल. त्यातून ही विविधता व त्यांचे फायदे संपुष्टात आणल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे बदल रोखण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
email: batmaheshbat@yahoo.com 

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...