कुटुंबवत्सल...

सुनील करकरे (सकाळ मधून )

विदर्भातल्या रणरणत्या उन्हाळ्यात ताडोबाच्या जंगलात फिरताना एक पूर्ण व्याघ्रकुटुंबच पाण्यात विसावलेले आम्ही पाहिले. "एकांतप्रिय' अशी ओळख पुसण्याचा चंगच जणू काही वाघांनी बांधला आहे. त्यात आघाडीवर आहे तो कान्हातील "बीटू' वाघ. आईविना पोरक्‍या झालेल्या बछड्यांचा सांभाळ याच नराने केला आणि त्यांना जगण्यासाठी सगळे काही त्याने शिकवले...

२००३ च्या जूनची नुकतीच सुरवात होती. संपूर्ण विदर्भात उन्हाळा ऐनभरात होता. तशात ताडोबाच्या जंगलात आमचे निसर्ग शिबिर सुरू होते. जंगलातील मोह, ऐन, किंजळ, रोहीण, करू आदी वृक्षांना मस्त हिरवीकंच पालवी आली असल्याने उन्हाळा तसा फारसा जाणवत नव्हता. नुकत्याच झालेल्या वळिवाने मात्र हवेत खूपच उमस होती. "वाघाई परिसरात वाघिणीचा आपल्या तीन बछड्यांसह वावर आहे,' या बातमीवर विसंबून आम्ही त्या परिसरातील जंगल वेंधत होतो. शेवटी गाडी फिरविणे थांबविले आणि वाघाईच्या तिगड्याजवळ आम्ही "फिल्डिंग' लावली. दुपारी चारची वेळ असेल. मोहाच्या गर्द सावलीतही गाडी चांगलीच तापली होती. वेळ जाता जात नव्हता. अचानक पांढरपौनी रस्त्याकडून एका भेकराने धोक्‍याची सूचना देणारा "अर्लाम कॉल' दिला. पाठोपाठ दुसरा, तिसरा चौथा... आमची सारी मरगळ दूर पळाली आणि पुढच्या मिनिटातच डाव्या बाजूच्या झाडीतून एक भलामोठा वाघ चाहूल घेत रस्तावर आला. ती "तीच' वाघीण होती. कारण पाठोपाठ तिचे तीनही बछडे झाडीबाहेर डोकावले. आईने चोहोदिशांना बघत अदमास घेतला. मग बछड्यांना हलक्‍या आवाजात साद घालून ती पुढे चालू लागली. त्यासरशी बछड्यांची वरात सुरू झाली. थोडे अंतर पार करून वाघीण रस्त्याच्या उजव्या बाजूला उतरली आणि पावसाचे गढूळ पाणी साठलेल्या एका खड्ड्यात जाऊन विसावली. पाठोपाठ तिघे युवराजही पाण्यात उतरले. खाली गढूळ पाण्याचा गारवा अन्‌ वरून मोहाची थंडगार सावली. त्यांच्या या सुखद बैठकीत व्यत्यय नको म्हणून आम्ही जरा दुरूनच तो नजारा अनुभवत बसलो.

अधूनमधून वाघीण पाण्यात कूस बदले आणि बछडे जागा- तेवढीच काय ती हालचाल. बाकी सारे रान आणि गाडीत बसलेलो आम्ही चिडीचूप. अचानक शांततेचा भंग झाला. खड्ड्यामागच्या झाडीतून पुन्हा धोक्‍याचा इशारा आला. या वेळी इशारा देणारे चितळ होते. आवाजासरशी वाघीण जरा दचकली अन्‌ बछडे कावरेबावरे झाले. चितळ एक आवाज देऊन गप झाले. मी अंदाज केला, पाण्याकडे येणाऱ्या चितळाला खड्ड्यात बसलेला व्याघ्र परिवार उशिराच नजरेस पडला असावा. पण पुढच्याच क्षणी वाघीण ताडकन जागीच उभी झाली. हा काय प्रकार याचा अंदाज बांधण्यापूर्वीच खड्ड्यामागच्या झाडीतून एक बलदंड वाघ पाण्यात उतरला. तो नर होता. आम्ही सारे अवाकच झालो. नर हळूच पाण्यात विसावला. मग भितभीत मादी. मग हळूहळू बछड्यांचा ताण निवळून तीही निवांत झाली. त्या लहानशा खड्ड्यात आधीच अडचणीत बसलेला परिवार आता चक्क एकमेकांना खेटून पाण्यात रेलला. त्यात वाघोबा लगतच्या छाव्यांचे अधूनमधून चाटून लाडही करत होते. असा अद्‌भुत नजारा मी अक्षरश- भान हरपून बघत होतो. छाव्यांची चुळबूळ सोडता पुढच्या अर्ध्या तासात वेगळे काही घडले नाही. अचानक हा व्याघ्र परिवार गडबडीने पाण्यातून उठला आणि खड्ड्यामागच्या झाडीत शिरला. पांढरपौनीकडून वेगाने येणाऱ्या एका गाडीने सारा घोळ घातला होता. आम्ही तडफडत भानावर आलो. हे सारे स्वप्नवत होते.

वाघ, वाघीण आणि त्यांची बछडे असे एकत्र मी प्रथमच पाहत होतो. मोठा खड्ड्याचा हा नजारा नंतर साऱ्या जून महिनाभर पर्यटक बघत होते. वाघांच्या वेगवेगळ्या जंगलात भटकंती सुरू करून मला तोवर दोन तपं होत आली होती आणि त्यापेक्षाही जास्त पूर्वीपासून वाघ आणि इतर वन्य जीव यावर माझे वाचन सुरू होते. तसेच १९९४ पासून मेळघाट, नागाझिरा, कान्हा, बांधवगड आणि ताडोबाच्या जंगलांतून वाघांना प्रत्यक्ष बघत आणि अनुभवतही होतो. तोपर्यंतच्या या लहानशा वाटचालीतून आणि अपुऱ्या ज्ञानातून एवढे मात्र माहीत झाले होते, की वाघ हा कुटुंबवत्सल प्राणी नक्कीच नाही. वाघ मुळात एकटाच राहणारा "सॉलिटरी' प्राणी. फक्त मिलनाच्या काळात नर मादी एक-दोन आठवड्यांसाठी एकत्र येतात आणि मिलन आटोपले, की आपापल्या साम्राज्यात परत जातात. क्वचित शिकार खाताना नर-मादी एकत्र दिसल्याच्या नोंदी. मिलनानंतर साधारणत- १७ आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर वाघीण दोन ते चार बछड्यांना जन्म देते. वाघिणीचे बाळंतघर हे गुहा, कपार, घळीपासून बांबूच्या रांजीपर्यंत कोणतेही सुरक्षित ठिकाण असू शकते. बछड्यांचे संपूर्ण संगोपन फक्त आईच करते. साधारणत- तीन महिन्यांपर्यंत फक्त आईच्या दुधावर पोसलेले बछडे मग हळूहळू मांस खायला लागतात. या काळात एकमेकांचा पाठलाग करणे, आईच्या शेपटीशी खेळणे अशा खेळांतून त्यांचे पूर्व शिक्षण होत असते. या काळात बछडे कोणाच्या दृष्टीसही पडणार नाही याची वाघीण कसोशीने प्रयत्न करते. (याला अपवाद म्हणजे गेल्या मे महिन्यात ताडोबातील जामुनबोडी परिसरातील वाघीण आपल्या जेमतेम महिनाभराच्या बछड्यांना दिवसा उजेडी सहज पाणवठ्यावर घेऊन येई.)

बछडे साधारणत- पाच-सहा महिन्यांचे झाले, की वाघीण त्यांना शिकारीचे प्रत्यक्ष धडे देऊन लागते. भक्ष्याचा पाठलाग केव्हा, कसा, कुठे करावा, तसेच भक्ष्य आटोक्‍यात येईपर्यंत दबा धरून कसे बसावे व आटोक्‍यात येताच त्यावर झडप कशी घालावी, याचे बारकावे बछडे अवगत करीत असतात. अशा शिक्षणासाठी रानडुक्कर केव्हाही छानच. असेच एकदा बांधवगडातील चक्रधाराच्या वाघिणीने मध्यम आकाराचे एक रानडुक्कर पकडून आणले आणि आपल्या चार बछड्यांचा हवाली केले. त्या जायबंदी झालेल्या डुकरावर बछड्यांना शिकारीचे शिकलेले धडे गिरवताना बघण्यात आमचा सफारीचा सारा वेळ तिथेच संपला.

गत वर्षीच्या उन्हाळ्यात कान्हामधील "सातनंबरी' वाघीण सकाळी सकाळी नजरेस पडली. सोबत तिची जेमतेम तीनेक महिन्यांची कन्या होती. मे महिन्यातही असलेला सकाळचा सुखद गारवा या व्याघ्रकन्येच्या कानात शिरल्याने ती एकटीच धमाल मस्ती करत होती. ती प्रौढ वाघीण आपल्या या सातव्या बाळंतपणानंतरही तेवढीच "केअरिंग' होती. बछडीही तेवढीच आज्ञाधारक होती. थोड्याशा अवधीतच आईने घातलेल्या हाकेवर कन्या क्षणार्धात दंगा थांबवून हजर झाली हे विशेष.

तज्ज्ञ असे सांगतात, की वाघिणीच्या एवढ्या पराकोटीच्या छत्रछायेखाली राहूनही निम्मे छावे युवा अवस्थेत पोचण्यापूर्वीच मारले जातात. आईपासून वेगळे झाल्यावर युवा अवस्थेत असताना हा धोका तर आणखीनच वाढतो. त्यात नर बछड्यांचा हा धोका तर जास्तच असतो. यात मार्जार कुळातील प्राण्यांच्या वर्तणुकीचा एक स्थायी स्वभाव असा आहे, की नर स्वत-ला दुसरा नर स्पर्धक म्हणून निर्माण होणार नाही यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. या स्थायी वर्तणुकीपायी व्याघ्र छावे हे नेहमीच मारले जातात. कान्हाच्या "सातनंबरी' वाघिणीचा झालेला अभ्यास याबाबत खूपच बोलका आहे. तिच्या तब्बल सात बाळंतपणांतून जन्माला आलेल्या १८ छाव्यांपैकी बारा बछडीही युवा अवस्थेतपर्यंतही जगू शकली नाहीत! पैकी सात बछड्यांना नर वाघाने मारले, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

अर्थात, निसर्गातील प्रत्येक कृतीला आणि घडामोडीला अपवाद असतोच. त्यातूनच ही सारी सृष्टी उत्क्रांत होत असते. २००३ च्या उन्हाळ्यात मोहा खड्डाच्या त्या व्याघ्र परिवाराने, विशेषत- त्या कुटुंबवत्सल वाघाने ताडोबाला अपार प्रसिद्धी मिळवून दिली. इकडे त्याच काळात अशी ख्याती कान्हाच्या जंगलातील कान्हा मैदानात आपले साम्राज्य निर्माण करणाऱ्या वाघाने मिळवली होती. पुढच्या सलग तीन वर्षांत या प्रचंड आकाराच्या वाघाला त्याच्या बच्चेमंडळींबरोबर रमताना आम्ही पाहत होतो. विशेष म्हणजे त्याच्या परिवारात कान्हा मैदानाभोवतालच्या जंगलातील तीन-चार माद्यांचा समावेश होता. एकदा तर तेथील नऊ नंबरच्या रस्त्यालगतच्या एका जलाशयात तो त्याच्या दोन माद्या आणि त्यांचे तब्बल सहा बछडे यांच्यासह एकत्र बसलेले छायाचित्रही माझ्या बघण्यात आले. कान्हा मैदानाचा हा "बुढा मेल' त्याच्या उतारवयात पूर्णपणे कुटुंबवत्सल झाला होता. रौद्र सौंदर्याचा प्रतीक असलेला बांधवगडचा "बीटू' (बी-टू) वाघ त्याच्या प्रेमळ स्वभावाने साऱ्या जगातील व्याघ्रप्रेमींचा अत्यंत आवडता वाघ झाला आहे. तो जितका कुटुंबवत्सल हे, तितकाच समस्त मार्जार कुळाच्या अगदी विपरीत हळुवार प्रणयी आहे. २००५ मध्ये मी पहिल्यांदा त्याला पाहिले ते तेथील चक्रधारा वाघिणीच्या चार युवा बछड्यांबरोबर पाण्यात लोळतानाच. पुढे त्याला एका वाघिणीबरोबर मिलन करताना पाहिले तेव्हा मार्जार कुळात आढळणारी आक्रमकता, गुरगुरणे, बोचकारणे, चावे घेणे असे काहीच आढळले नाही. दिसला तो त्याचा हळुवारपणा, नाजूक सलगी आणि मादीला रिझवण्याची मोहक अदा! मधल्या वर्षात तर तो पूर्ण वेळ मातेच्या भूमिकेत होता हे आणखी खास. त्याची एक वाघीण "बनबेही फिमेल' तिनेच मारलेल्या बैलावर केलेल्या विष प्रयोगाला बळी पडली. त्या वेळी तिला जेमतेम सहा-सात महिन्यांचे तीन छावे होते. या आईविना पोरक्‍या पोरांचा सांभाळ "बीटू'नेच केला. एवढेच नव्हे, तर जगण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व गोष्टींत त्यांना पूर्ण तरबेज करून त्यांना आपल्या "पायावर' उभे केले! बांधवगडचे सर्व जंगल कर्मचारी, वाटाडे, मार्गदर्शक, जिप्सीचालक यांच्याजवळ जराही वाघांचा विषय काढा- पाहिले नाव "बीटू'चेच येईल. माझा तेथील जिप्सीवाला पिंकू लगेच सुरात सुरू करतो, "अरे।।।।, बीटू का मत पुछियो. वो।।। तो बहुतही भला है, बनबेहीके बच्चोको उसीने बडा किया है. बडाही।।। गजब है.' हे सारे आठवायचे कारण म्हणजे, नुकतीच ताडोबातील संजूकडून एक खूषखबर कानी पडली. तेलिया डॅम परिसरातील वाघाला त्याच परिसरातील वाघीण आणि तिच्या चारही छाव्यांसह एकत्र वावरताना पाहिले. या चार छाव्यांमध्ये दोन नर आहेत. आता किमान त्यांना तरी या स्थानिक नरवाघापासून धोका होणार नाही!

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...