उजनीचे पक्षी संमेलन


 
ऋतुमानाने हिवाळ्यात प्रवेश केला, की उन्हाभोवतीची गर्दी वाढू लागते. तान्ह्य़ा बाळापासून ते वृद्धांपर्यंत सारेच जण या कोवळ्या किरणांच्या कवडश्यात घुटमळू लागतात. ऊर्जा - उष्णतेचा शोध घेतात. खरे तर याची गरज केवळ माणसालाच नाही, तर अन्य पशू-पक्ष्यांनाही तेवढीच. कुठे उत्तर गोलार्धात गोठवणारी थंडी पडते आणि तिथले पक्षी याच ऊर्जा आणि उष्णतेच्या शोधात दक्षिणेकडे सरकतात. आमच्या गावा-शहराजवळच्या पाणथळ जागा त्यांच्या या किलबिलाटाने भरून जातात. पुण्याजवळचा उजनी जलाशय तर यात फारच नशीबवान. ऋतुचक्राची ही पूरक पावले पडली, की सारा जलाशय या विहंग सोहळ्यात दंग होऊन जातो.
पुण्याहून साधारण सव्वाशे किलोमीटरवर हा उजनी जलाशय. पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूरजवळ साकारलेले हे महाराष्ट्रातील एक विस्तीर्ण धरण. परंतु या धरणाला स्वत:चा पाऊस नाही आणि त्यामुळे पाणीही नाही. पुणे जिल्ह्य़ाच्या मावळतीला सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यालगत असलेली धरणे धुवाधार पावसाने भरून वाहू लागली, की त्यातील वाहून येणारे पाणी या उजनी जलाशयात जमा होते.
सोलापूर जिल्ह्य़ातील माढा तालुक्यातील उजनी गावी या धरणाची भिंत आहे. या उजनीपासून ते दौंड तालुक्यापर्यंत या धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे. यातही उजनी अलीकडच्या कांदलगावपासून ते भिगवण जवळच्या डिकसळपर्यंतचा जलाशयाचा भाग हा सपाटीचा आहे. यामुळे या भागात पाण्याला खोली असण्यापेक्षा विस्तार अधिक आहे. पक्ष्यांना मुबलक खाद्य मिळण्यासाठी ही अत्यंत आदर्श स्थिती. गेल्या अनेक वर्षांपासून, विशेषत: हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांचे उजनीशी जे नाते जडले ते या आदर्श स्थितीतूनच!


उजनीचे पक्षी पाहायचे असतील तर भिगवण, पळसदेव, कांदलगाव दरम्यानचा चाळीस किलोमीटरचा भाग महत्त्वाचा. यातही चांगल्या निरीक्षणासाठी भिगवणजवळचे डिकसळ, कुंभारगाव, काळेवाडी आणि पळसदेव ही जलाशयाकाठची गावे महत्त्वाची. इंदापूर, सोलापूरकडे जाणाऱ्या सर्व एसटी बस यातील भिगवण आणि पळसदेव गावी थांबतात. इथे उतरून वरील पक्षितीर्थावर जाणे सोपे पडते. परंतु या पेक्षाही स्वत:चे वाहन घेऊन इकडे येणे अधिक सोयीचे.
साधारणपणे कुठलेही पक्षी हे सकाळी किंवा संध्याकाळी अधिक सक्रिय असतात. पक्ष्यांना अन्नाची सर्वाधिक गरज या काळात असल्याने त्यांचे दर्शन सहज शक्य होते. यामुळे पक्षी निरीक्षणासाठी हीच ती आदर्श वेळ; यातही सकाळची वेळ अधिक फायद्याची. यामुळे जरा भल्या सकाळीच जलाशयावर हजर व्हावे. उजनीपासून दूर राहणाऱ्यांनी वेळ पडल्यास आदल्या दिवशी भिगवण, इंदापूरला मुक्काम करत सकाळी जलाशय गाठावा.
भल्या पहाटे धुक्याचे पदर दूर करत या जलाशयावर यावे. दूरवर पसरलेला तो निळाशार जलाशय. सकाळच्या कोवळ्या उन्हात नुकताच तो जागा होत असतो. या साऱ्या धुकट-अस्पष्ट चित्राला जाग येते तीच पक्ष्यांच्या किलबिलाटाने. पुढे जेव्हा हळूहळू हे दृश्य स्वच्छ स्पष्ट होते तेव्हा उडायलाच होते!
.. सारा जलाशय विविधरंगी, आकारातील हजारो पक्ष्यांनी भरून गेलेला असतो. काही काठालगत एकटे-दुकटे, काही गटाने विहार करणारे तर काहींच्या अगदी झुंडी इकडून तिकडे उधळणाऱ्या. एका मोठय़ा 'कॅनव्हास'वरील हे 'वाईड'दृश्यच आल्या -आल्या मन हरपून टाकते. मनाचा हा गोंधळ सोडवता सोडवताच मग पक्षी निरीक्षण सुरू होते. या निरीक्षणासाठी धरणाच्या काठाने निघायचे. बरोबर दुर्बीण, कॅमेरा, नोंदवही असेल तर उत्तम. खरेतर उघडे डोळेही अपुरे पडतात. सुरुवातीला हे एवढे पक्षी पाहून काहीच कळत नाही. पण मग एखाद्या अभ्यासकाच्या मदतीने किंवा चक्क एखाद्या संदर्भ पुस्तकाच्या साहाय्याने आपण हे पक्षी संमेलन वाचू-पाहू शकतो.


रोहित, कृष्णबलाक, चित्रबलाक, अन्य करकोचे, ब्राह्मणी बदक, ठिपक्यांचे बदक, तिरंदाज, पाणकावळा, वंचक, नदी सुरय, शराटी. अशी किती नावे घ्यावीत. स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांचा हा जणू कुंभमेळाच!
पक्ष्यांचा प्रकार, ओळख, त्याची स्वभाववैशिष्टय़े, तो आढळला तिथले स्थान, त्याच्या हालचाली, रंगसंगती, आकार.. अशा अनेक अंगांनी पक्षी निरीक्षण, नोंदी सुरू होते.
उजनीच्या जलाशयावर सर्वाधिक संख्या ही बदकांची आढळते. काही जोडय़ांनी तर काही अगदी शेकडय़ांच्या थव्यांनी, यातील ब्राह्मणी बदक, ठिपक्यांचे बदक त्याच्या रंगसंगतीवरूनच लक्ष वेधून घेते.
पक्ष्यांच्या या जातीत काही स्थिर, स्थितप्रज्ञ तर काही अत्यंत लाजाळू, अस्थिर! पाणडुबी हा यातील दुसऱ्या प्रकारातील. त्याच्या सुरक्षेची थोडीशी सीमा ओलांडून आपण पुढे गेलो, तर लगेच पाण्यात बुडी मारत हे पसार होणार. दुसरीकडे बगळ्यांचे सारे भाईबंध त्या गुडघ्याएवढय़ा पाण्यात निश्चलपणे उभे असतात. जणू अघ्र्य देण्यासाठी उभे ठाकलेले हे तपस्वी!
सापासारखी मान असलेले तिरंदाजही असेच लक्ष वेधून घेणारे. यांच्या मानेत जणू एखादी 'स्प्रिंग' बसवलेली. यामुळे ती सतत मागे-पुढे होणारी . भालाफेक करणाऱ्या एखाद्या खेळाडूप्रमाणे भासणारे हे तिरंदाज अचानकपणे पाण्यात सूर मारतील आणि एखादा मासा पकडून आणतील.
पाणकावळ्यांची तर इथे जणू फौजच! अनेकदा धरणालगतच्या एखाद्या खडकावर ही सारी मंडळी ऊन खात बसलेली. त्यांच्या अवतीभवती मग पांढऱ्या शराटी, काळ्या शराटी, नदी सुरय, वंचक, चित्रबलाक तळ ठोकून असतात. यातील चित्रबलाक आवर्जुन पाहायचा. उंच्यापुऱ्या या देखण्या पक्ष्याच्या निर्मितीवर विधाता भलताच खूश, रंगांचे सारे नजारे त्याच्यावर उधळलेले. या चित्रबलाकांची उजनीजवळच इंदापूर आणि भादलवाडी येथे दोन मोठी सारंगागार आहेत.उजनी पक्षी संमेलनात रोहित इथला राजा. पाण्याच्या मधोमध या राजबिंडय़ा पक्ष्यांचे थवे उतरलेले असतात. चार साडेचार फूट उंची, लांबसडक गुलाबी पाय, फिक्कट गुलाबी पांढरे शरीर, आणि गुलाबी रंगाचीच लांबलचक मान-चोच. रोहितचे हे दर्शनच राजहंसी, राजबिंडे!
बलाक कुळातील या पक्ष्याला अग्निपंख, अग्निवर्ण अशीही नावे आहेत. इंग्रजीत 'फ्लेमिंगो'(Flemingo) म्हणून त्याची प्रचलित ओळख आज सगळीकडे रूढ झाली असली तरी खेडोपाडी या फ्लेमिंगोलाच 'पांडव' म्हणतात, हे मात्र फार कमी लोकांच्या गावी असते.
या रोहितचा इथला वावरही एकदम शिस्तीत असतो. एका रांगेत थांबायचे, एका रांगेत चालायचे. अन्न मिळवण्यासाठी एकाचवेळी साऱ्यांनी आपल्या माना त्या पाण्यात खुपसायच्या. छोटे खेकडे, मासे, किडे, अळ्या, पाणवनस्पतींच्या बिया किंवा सेंद्रिय कण या साऱ्यांवर ताव मारायचा. जोवर सुरक्षित वाटते तोवर इथला त्यांचा हा विहार असाच चालू राहतो. पण थोडी कुठे संशयास्पद हालचाल जाणवली, की यांच्यातलाच एखादा म्होरक्या 'हाँक' असा आवाज देतो. या आवाजासरशी बाकीचेही आपल्या मानांचे मनोरे उभे करतात. काही वेळ अंदाज घेतात. सुरक्षित वाटले तर पुन्हा अन्नसाधना सुरू होते. नाहीतर मग पुन्हा एकवार 'हाँक'चा इशारा होतो आणि सारा थवा त्यांच्या पंखांची फडफड करत आकाशात झेपावतो.
रोहित पक्ष्यांचे अवकाशी उडणे हे अनुभवण्यासारखे; ज्या वेळी ते भरारी घेतात, त्या वेळी त्यांच्या पंखातील भडक केशरी रंगाचा भाग उघडा पडतो. जणू आगीचा गोळा उडाल्याचा भास होतो. अग्निपंख, अग्निवर्ण ही रोहितची नावे यावरूनच त्याला मिळालेली. निळ्या आकाशातील त्यांचा तो विहार त्या नभालाही सौंदर्य बहाल करतो. जणू हे देवलोकीचे दूत गंधर्व ! सारेच अवर्णनीय!!
साधारणत: हिवाळ्यात सुरू होणारा हा उजनीचा पक्षिसोहळा उन्हाळ्यापर्यंत बहरत जातो. आजुबाजूचे पाणवठे आटू लागले की खाद्य व पाण्याच्या शोधात स्थानिक पक्षीही आपला प्रवास इकडे वळवतात आणि उजनीचा हा किनारा किलबिलाटामध्ये आणखी रंगून जातो.-अभिजित बेल्हेकर abhijit.belhekar@expressindia.com ,लोकसत्ता

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...