नांदूर मध्यमेश्वरला परदेशी पक्ष्यांची संख्या ३० टक्क्य़ांनी वाढली(Migrated birds to Nandur Madhyameshwar)

थंडीच्या गुलाबी वातावरणाने नांदूर मध्यमेश्वरचा परिसर बहरून गेला असतानाच देशी-विदेशी पक्ष्यांच्या झालेल्या आगमनाने या परिसराचा नूरच पालटला आहे. देशी -परदेशी पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र या वर्षीपासून वनविभागाने पर्यटकांसाठी ठराविक शुल्क आकारण्याचा आदेश काढला आहे.
 नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात सैबेरिया, मध्य आफ्रिका, मध्य आशिया, मध्य युरोप, इराण, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीरचा काही भाग, लडाखचा, तिबेटचा परिसर, राजस्थानचा काही भाग व कच्छचा परिसर, हिमालयाच्या भागातून दरवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान पक्ष्यांचे आगमन मोठय़ा प्रमाणावर होते. डिसेंबरच्या महिन्यात तर परदेशी पक्ष्यांनी नांदूर मध्यमेश्वरचा परिसर फुलून जातो. त्यामुळे धरण परिसरात पक्षी निरीक्षणासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. नांदूर मध्यमेश्वरच्या जलाशयातील परिसरात आजूबाजूस  हिरवीगार शेती व बहरलेली वनराई आहे, या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे ती फुलून आली आहे. वेगवेगळ्या जातींचे पक्षी दरवर्षी भ्रमंती करीत येथे येतात. त्यांची संख्या जवळपास १२ ते १३ हजारांच्या आसपास असते. यंदा गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत पक्ष्यांची टक्केवारी ३० टक्क्य़ांनी वाढली आहे, असे निदर्शनास आल्याचे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे. दक्षिणगंगा गोदावरी नदी तसेच कादवा नदीचा संगम नांदूर मध्यमेश्वर परिसरात झाला आहे. नांदूर मध्यमेश्वरचे धरण ब्रिटिश काळात बांधले गेले. त्यास आज एक शतक पूर्ण झाले आहे. या नद्यांना येणाऱ्या पुरामुळे साचणाऱ्या गाळामुळे अनेक बेटे येथे तयार झाली असून त्या बेटांच्या उथळ पाण्यात असणारी नैसर्गिक मत्स्य संपदा, वनराई, बहरलेला हिरवागार परिसर यामुळे देशी-विदेशी पक्ष्यांचे ते आवडते ठिकाणच बनत गेले आहे.
साधारणत: डिसेंबर ते मार्चअखेरच्या कालखंडात गुलाबी पायांचा शेकटय़ा (ब्लॉक विंग स्टील्ट), रफ अँड रिन्ह, करल्यु सँड पायपर, हरिम सुरया (ग्रीन शँक), रक्त सुरया (रेड शँक), बारटेल गॉडविन, पाणकावळे, बगळे, खंडय़ा चित्रबलाक, मुग्धबलाक, चमचा, काळा शराटी, रोहित, सळसुची, चकुवाक, कांडवा करकोचा, चांदवा, कमळपक्षी नदीसुरय, नावी, लडाख व मध्य रशियामधून येणाऱ्या विविध प्रकारचे बदकांमध्ये चकुवाक (सोनेरी बदक), पीन टेल, शॉवेल, वीजन, कॉमन टिल, टफटेड पोनार्ड, डेमॉइसल केन व करामोरंट तसेच स्थलांतरीय होणाऱ्या पक्ष्यांतून बडय़ा चोचींचा करकोचा (ओशनबील स्टॉर्क), रंगीत करकोचा (पेन्टेड स्टॉर्क), पांढरा अवाक (व्हाइट आयबील) कुट, पांढरा डुबी (डॉबचीक), नदीसुरया (टर्न), शुभ्रमानी करकोचा (व्हाइट नेकेड स्टॉर्क), काळा आवाक (ग्लॉसी व ब्लॅक आयबीस) तसेच रोझी पॅस्टर आदी पक्ष्यांचे थवेच्या थवे येथे विहार करताना दिसतात. सुरूची, टिटवी (जपेवँग), तरंग, हरीण, लाकाळी, होलापारवा, तुतारी, वेगवेगळ्या प्रकारचे धोबी, गप्पीदास कापरा, शंकर, भारिट व भोरडय़ा चक्रांग, गडवाल, वैष्णव, भिवई, वेडर्स, चिखली, गाडवीट, तलवार, कुरत, पानभिंगरी, श्वेन बदक, पट्टकदंब, कोकिळा, रिव्‍‌र्हर टर्न, कारमोरंट, केनटिटा, चिखली (केन टिटा प्लवर), धनवड (स्पीटबील), जांभळी कंबडी (मुडटेन), चांडवा (कुट), शेंटी बदक (टफटेड पोचार्ड), सळसची (पीनटेल), पांढऱ्या तुऱ्याच्या कोंचची (डेमॉइझल केन), आपटय़ा (शॉवेलर), लालसरी (कॉमन पचार्ड), रोहित (फ्लेमिंगो), तापपक्षी, (वायलटेपड सॉल), स्मून बील, व्हेल्ट डग, अशा प्रकारचे जवळपास ३५० ते ५०० हून जास्त प्रजातीचे पक्षी चार महिन्यांच्या कालावधीत येथे येतात. या परिसरात पक्षी निरीक्षणासाठी मनोरे उभारले आहेत. मात्र काहींची दुरवस्था झाली आहे. काही समस्याही आहेत. त्या शासनाने सोडविण्याची पर्यटकांची मागणी आहे. काही वर्षांपूर्वी नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनी भेट दिली होती. त्यांच्या निरीक्षणानंतर या नांदूर मध्यमेश्वरची ख्याती दूरवर पसरली गेली.  


महेश जोशी,लोकसत्ता 

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...