Mother & Child -The Desert Fox(Courtsy:indianaturewatch.net)Photo:Nirav Bhatt खोकड मादी व तिचे पिल्लू |
भारतीय लांडगा, खोकड (डेझर्ट फॉक्स), बिबट्या हे प्राणी, तर रानकस्तुर (लार्ज व्हिसलिंग थ्रश), ऑस्प्रे, समुद गरूड, मोर व तणमोर हे पक्षी आणि भारतीय सरडा, घोरपड हे सरपटणारे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लांडगा, लेपर्ड कॅट, डेझर्ट कॅट, खवले मांजर, पिसोरी, चिंकारा या वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आहे. व्हाइट स्पूनबिल, ससाणा, माळढोक, धनेश या पक्ष्यांचे; तसेच भारतीय नाग, धामण व घोणसचे अस्तित्व संकटात आहे.
पुणे वन विभागाने सन २०१२-१३ ते २०२२-२३ या दहा वर्षांचा प्रारूप कार्य आराखडा (वर्किंग प्लॅन) तयार केला आहे. यामध्ये वनांची सद्यस्थिती, वनक्षेत्र, वनांचे संरक्षण, भविष्यातील वन आणि वन्यजीव व्यवस्थापन, नागरी वन व्यवस्थापन, वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसह नामशेष होणाऱ्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काय उपाययोजना करता येतील या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
पुणे वनक्षेत्रातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्यजीवांबरोबरच धोक्यातील वनस्पती, कीटक, सरपटणारे प्राणी याची माहिती या आराखड्यात देण्यात आली आहे. वन विभागाने आगामी दहा वर्षांत राबवायच्या आराखड्यात गतकाळातील वन व्यवस्थापनातील त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. त्यात बदल करण्याबरोबरच आणखी काही नवे व्यवस्थापन करता येईल काय यादृष्टीने विचार केला आहे.
वनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा योग्य प्रकारे विनियोग, वनांचा सामाजिक-आर्थिक अभ्यास, पंचवार्षिक योजना, कर्मचारी व मजूर नियुक्ती, गतकाळातील वन व्यवस्थापन यावर आराखड्यात माहिती देण्यात आली आहे. संयुक्त वन व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग, वनांचे संरक्षण, जुन्या वनीकरणाचे व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या योजनांवर या आराखड्यात भर देण्यात आला आहे.
-म. टा. प्रतिनिधी, पुणे
0 Comments:
Post a Comment