नाशिकच्या मखमलाबाद परिसरात शिरलेल्या बिबटय़ाने माजवलेल्या दहशतीने मानव-वन्यप्राणी संघर्ष शिखरावर पोहोचल्याचे पुरेसे संकेत दिले आहेत. मखमलाबादच्या दूपर्यंत पसरलेल्या द्राक्षांच्या मळ्यात हिंस्र प्राण्यांचा वावर आता नवीन राहिलेला नाही. जवळपासच्या जंगलातील हिंस्र श्वापदे आता मानवी वस्त्यांच्या दिशेने वळू लागली आहेत. गेल्या काही महिन्यांत आसामातही बिबटय़ांचे शहराच्या सीमा ओलांडून वस्त्यांमध्ये शिरण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडले. देशभर गेल्या वर्षभरातील अशा संघर्षांत ४३ बिबटय़ांना ठार करावे लागल्याची धक्कादायक आकडेवारी जाहीर झाली आणि वन्यजीवप्रेमी हादरले. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात हत्तींचा उपद्रव आता नेहमीचाच, पण गीरच्या जंगलातील सिंहांचे कळप नजीकच्या गावापर्यंत जाऊ लागले आहेत, काझीरंगातील गेंडय़ांनाही आता शहराची सवय झाल्याप्रमाणे ते बिनधास्त जंगलाबाहेर पडू लागले आहेत. आसामात हत्तींचे कळप धुमाकूळ घालू लागले आहेत. यामागची मूळ कारणे उघड असूनही सारा राग मूक जीवांना सर्रास ठार करून त्यांच्यावर काढला जात आहे. जंगलांवर माणसाने केलेले अतिक्रमण दिवसागणिक एक पाऊल पुढे टाकत आहे. परिणामी उजाड झालेल्या जंगलांमधून बाहेर पडलेले वन्यजीव सैरभैर होत आहेत. वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास संपत चालल्याने ही समस्या आणखी उग्र बनत चालली आहे. वन्यप्राणी गावांच्या दिशेने वळण्याच्या घटना उन्हाळ्याच्या दिवसात सर्वाधिक घडतात. उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे पाणी आणि भक्ष्याच्या शोधात वन्यप्राणी गावात शिरण्याचे दिवस आले आहेत. जसजशी उन्हाळ्याची तीव्रता वाढेल तशा या घटनांच्या बातम्या कानावर आदळत राहतील. परंतु बहिऱ्या झालेल्या सरकारी यंत्रणेला यावर मार्ग काढण्याची मनापासून इच्छा नसल्याने जंगल क्षेत्राच्या आसपास राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचे काय, या प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीण आहे. वस्तीत घुसखोरी करणारा हिंस्र प्राणी एक तर जमावाच्या संतापाला बळी पडतो किंवा तो अनावर झाल्याने त्याला गोळ्या घालण्याशिवाय पर्याय राहत नाही. पण ही वेळ का येत आहे, याकडे दूरदृष्टीने पाहिले पाहिजे. भौगोलिक क्षेत्रफळाच्या एकूण ३३ टक्केजंगल क्षेत्र असेल तर पर्यावरण संतुलन साधले जाते, अशी जगभरातील प्रमाणित आकडेवारी आहे. परंतु देशात २३.८ टक्केच भूभाग जंगालांचा आहे आणि २००९च्या तुलनेत ०.५ टक्के जंगलाचा विनाश झाला आहे , अशी ताजी आकडेवारी आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील जंगलांची भरमसाट तोड झाल्याचे यातून ध्वनित झाले आहे. दोनच दिवसांपूर्वी ताडोबाच्या जंगलात भीषण आग लागली. ही आग मानवनिर्मित असल्याचा संशय आहे. परंतु ही आग नसून नैसर्गिक वणवा असल्याचे सिद्ध करण्याची केविलवाणी धडपड वन विभागाने चालविली आहे. वणव्यामुळे विस्थापित झालेले वन्यजीव मानवी वस्त्यांच्या दिशेने कूच करू लागतील तेव्हा आणखी गुंतागुंत निर्माण होईल. यावर तोडगा पर्यायाने बुद्धिवंत माणसालाच काढायचा आहे. या समस्येची व्याप्ती मर्यादित नाही. जगभर हा मुद्दा चर्चिला जात आहे. नाशिकमधील बिबटय़ाचा हल्ला हे हिमनगाचे टोक आहे. पण लक्षात कोण घेतो?
सौजन्य:लोकसत्ता
सौजन्य:लोकसत्ता
0 Comments:
Post a Comment